यंदा दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झालाय. काही लोक म्हणतात दिवाळी आज 31 ऑक्टोबर तर काही जण म्हणतात उद्या 1 नोव्हेंबरला आहे. यामागे सर्व घोळ हा दोन दिवस प्रदोष काळात अमावस्या तिथी आल्यामुळे झाला आहे.अशात महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन कधी करायचं याबद्दलचा गोंधळ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दूर केलाय.
दिवाळी कधी आहे
आश्विनी महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो. पंचांगानुसार अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटापासून 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटापर्यंत असणार आहे. त्यासोबत प्रदोष काळ आणि वृषभ काळ हे दोन शुभ काळ दिवाळीत पूजेसाठी महत्वाचे आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार प्रदोष आणि वृषभ काळात दिवाळी पूजा किंवा लक्ष्मी पूजा करणे खूप शुभ मानले जाते.
काही ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात जर तुम्हाला अमावस्या तिथीमध्येच शुक्रवार 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करायचं असेल तर 5 वाजून 53 मिनिटापर्यंतच करावं लागणार आहे.
दिवाळीतील प्रदोष कालचा सर्वोत्तम योग
प्रदोष काळातील खूप चांगला योगही गुरुवारी पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवशी प्रदोष काल, निशीथ काल आणि महानिषित काल यांचा शुभ संयोग आहे. धार्मिक शास्त्रानुसार दिवाळीच्या पूजेमध्ये प्रदोष कालावधी खूप महत्त्वाचा आहे. प्रदोष काळ हा घरगुती आणि व्यावसायिक कामांसाठी महत्त्वाचा आहे.
लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त अमावस्या काळात – संध्याकाळी 5:36 ते 6:15 पर्यंत
प्रदोष काळात लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त – संध्याकाळी 5:35 ते रात्री 08.06 पर्यंत
भारतात कुठल्या शहरात कधी दिवाळी
खरं तर उत्तर भारतीय 31 ऑक्टोबर तर महाराष्ट्रातील मराठी लोक 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार आहेत.
दिल्ली आणि मुंबईत 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.
उत्तराखंडमध्ये 1 नोव्हेंबरला, हरियाणा, बिहार आणि उत्तर भारतात 31 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे.
लक्ष्मीपूजन साहित्य
लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती
गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती
कुबेराचा फोटो किंवा मूर्ती
नाणी किंवा नोटा
दागिने किंवा चांदीची नाणी
एक कोरीवही घ्यावी त्यावर कुंकवाने ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा.
चौरंग किंवा पाठ
लाल रंगाचे कापड
पाणी
तांदूळ
गंध
पंचामृत
हळद, कुंकू
अक्षदा
फुले
विड्याची पाच पाने
झाडू
लाह्या बताशे
लक्ष्मीपूजन विधी
लक्ष्मीपूजन विधी करण्याकरिता सर्वप्रथम देवघरामध्ये एक चौरंग ठेवावा त्यावर लाल कापड अंथरून घ्यावा.
त्यावर उजव्या बाजूला कळस मांडावा त्या कळसांमध्ये पाच विड्याची पाने टाकावी,
एक रुपयाची नाणी टाकावे आणि कळसाच्या वर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असली पाहिजे.
आपण जो चौरंग घेतला आहे, त्या चौरंग वर मध्यभागी तांदुळाची रास करावी.
त्यावर गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
जर तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारी ठेऊ शकतात.
त्यानंतर चौरंगावर जागा शिल्लक असेल त्या जागेमध्ये हिशोबाची वही आणि पेन ठेवावी तसंच पैसे नाणी ठेवावे.
त्यानंतर चौरंगाची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यावी.फराळ आणि लाह्या बताशे यांचा नैवेद्य दाखवावा.
झाडूला लक्ष्मी मानतात म्हणून नवीन झाडूची पूजा केली जाते.
चांदी, तांबा किंवा मातीचं कलश घ्यावं त्यात गंगाजल मिसळून घ्यावे. कलशावर नारळ ठेवून त्यात एक आंब्याचे डहाळे ठेवावे. कलशाभोवती फुलांची आरास करावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी.
लक्ष्मी देवीसमोर सोने, चांदी किंवा साधी नाणी ठेवावी. यानंतर कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. लक्ष्मीजवळ व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी, नवीन डायरी ठेवावी.
पूजेचे सामान शुद्ध करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे.
लक्ष्मी मंत्र किंवा ‘ऊँ महालक्ष्मयै नम:’ मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह पूजा करावी.यानंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकले असल्यास क्षमायाचना करावी.
लक्ष्मीपूजनावेळी पाळायचे काही नियम
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुरू ठेवावेत.
लक्ष्मी पूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योत तेवत ठेवावी लक्ष्मी देवीला शिंगाडा, बत्ताशे, लाह्या, करंजी, तांदळाचे लाडू, मूगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे. यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.