अमळनेर : – तालुक्यातील अमळगाव शिवारात कारमधील तरुणांनी दुचाकीला कट मारल्यानंतर त्यात झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आज दि. ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास तालुक्यातील जळोद-अमळगाव शिवारात घडली. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेतील तिन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासातच अटकही केली आहे.
विकास प्रवीण पाटील (वय ३० रा. अमलेश्वर नगर, अमळनेर) हा मित्रांसह पिंगळवाडे येथे तमाशा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्या मोटरसायकलला स्विफ्ट कार (एमएच १९ बीजे ४७९१) ने कट मारला. यात दुचाकीचे इंडिकेटर तुटले. (केसीएन) त्यावरून दोन्ही गटात वाद होऊन अमळगाव जळोद रस्त्यावर हाणामारी झाली. त्यानंतर काही जणांनी लोखंडी रॉड, दांडके घेऊन आले. त्यात विकास पाटील हा पळत सुटला. मात्र त्याला गाठून संशयित आरोपींनी मारहाण करून त्याचा खून केला व पसार झाले. ही घटना ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली.
घटनेचे वृत्त कळताच मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील, संजय पाटील यांनी भेट दिली. मयत विकास पाटील याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. तेथे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनास्थळावरून आरोपी फरार झाले आहे. मात्र त्यांची धरपकड सुरु असून एलसीबीच्या टीमने जामनेर तालुक्यात तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून एक जण शेंदुर्णी परिसरात शिक्षक असल्याचे सूत्रांनी सांगितलं. (केसीएन) संशयित आरोपी अमोल वासुदेव कोळी, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव, मनोज हनुमंत श्रीगणेश, कमलाकर हनुमंत श्रीगणेश, रोहित सीताराम पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून अमोल कोळी, नितीन पवार, हर्षल गुरव यांना जामनेर तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. आणखी संशयित आरोपी वाढण्याची शक्यता आहे.