किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाने लग्नासाठी बनला बनावट आयपीएस अधिकारी, साखरपुडाही केला, पण अशी झाली पोलखोल.

Spread the love

मसुरी (उत्तराखंड) :- लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असते. मात्र अनेकदा लग्न करताना फसवणुकीचे प्रकार समोर येत असतात. उत्तरराखंडमधील मसुरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून एका मुलीशी साखरपुडा केला होता. परंतु तरुणीच्या कुटुंबीयांसमोर तरुणाची फसवणूक उघडकीस आली. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लग्न मोडून तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मसुरी येथील एका किराणा दुकानात काम करणाऱ्या आणि जयपूरच्या प्रागपुरा भागातील रहिवासी असलेल्या सुनील कुमारने आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांची फसवणूक केली आहे. धक्कादायक म्हणजे त्याने याआधी राजस्थान पोलीस हवालदार, आयकर अधिकारी आणि आयपीएस अधिकारी असल्याचा दावा केला होता. मुलींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तो मसुरी आयपीएस ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचा. हे फोटो पाहून मुलींच्या कुटुंबीयांना तो आयपीएस अधिकारी असल्याची खात्री पटली. यानंतर त्यांनी लग्नाला होकार दिला होता आणि सारखपुडाही झाला होता.

मात्र सुनीलचे सत्य सर्वांसमोर आले. मुलीचा भाऊ आणि त्यांच्या मित्रांना भेटायला सुनीलने मसुरीला बोलावले होते. यावेळी स्थानिक लोकांनी मुलीच्या भावाला सांगितले की, सुनील हा अधिकारी नसून एका दुकानात काम करतो. या खुलाशानंतर मुलीच्या कुटुंबीयांना धक्का बसला आणि त्यांनी लगेच लग्न मोडले. लग्न मोडल्यानंतर मुलीचे वडील बद्रीप्रसाद चौहान यांनी सुनीलला लग्नात दिलेल्या वस्तू परत करण्याची विनंती केली. मात्र सुनीलने नकार दिला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी प्रागपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर सुनीलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सध्या सुनीलला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहेत. मात्र लग्नासाठी आरोपी सुनील हा बनावट आयपीएस अधिकारी बनल्याने मसुरीमध्ये या प्रकरणाची चर्चा होताना दिसत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी