मुंबई : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.ती म्हणजे हवामान अंदाज आणि कृषी जोखीम उपाय या क्षेत्रातील भारतीय कंपनी स्कायमेटने 2022 साठी मान्सूनचा अंदाज जाहीर केला असून त्यात यंदाचा मान्सून सामान्य राहिल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सूनची सुरुवात चांगली होईल आणि जून महिन्यातच जास्तीत जास्त पाऊस अपेक्षित आहे, असंही स्कायमेटकडून सांगण्यात आलं आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाची दीर्घकालीन सरासरी ८८०.६ मिमी आहे. दरवर्षी या आकडेवारीशी तुलना करून पावसाचा अंदाज वर्तवला जातो. दीर्घकालीन सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण मानला जातो. यंदाचा मोसमी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९८ टक्के इतका बरसणार आहे.
या दरम्यान गुजरातमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल, तर पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात जास्त पाऊस पडेल. शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असून मान्सून त्यांच्यासाठी चांगला असेल, कारण सुरुवातीच्या महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल, यामुळे शेतकऱ्यांना खूप मदत होईल.
स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार…
– राजस्थान, गुजरात, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि ईशान्येकडील त्रिपुरा सोबतच संपूर्ण हंगामात पावसाच्या कमतरतेची शक्यता आहे.
– केरळ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात जुलै आणि ऑगस्टच्या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडेल
– पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील कृषी क्षेत्र आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पावसावर आधारित भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल.
– जूनच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात चांगली होईल