नवी दिल्ली : झारखंडच्या देवघरमध्ये रोपवेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. रविवारी दुपारची ही घटना असून अजूनही 48 जण या रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकले आहेत. सध्या एनडीआरएफ आणि आयटीबीपीच्या मदतीने बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
देवघडच्या त्रिकुट पर्वतावर जाणारा हा रोपवे आहे. सध्या हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांची सुटका करण्याचे काम सुरू आहे. झारखंडच्या देवघरमध्ये त्रिकुटी डोंगरावर रोपवेचा भीषण अपघात झाला. अजूनही अनेक पर्यटक रोपवेमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. राज्य सरकारच्या विशेष विनंतीनुसार, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप परत आणलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
भारतीय हवाई दलाचं हेलिकॉप्टर आज सकाळी साडेसहा वाजता त्रिकुटी पर्वतावर पोहोचण्याची शक्यता आहे. यासह ITBP, भारतीय सेना आणि NDRF ची टीम त्रिकूट पर्वतावर पोहोचली आहे. अडकलेल्या सर्व पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून ट्रॉलीतून सुखरूप खाली आणले जाणार आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप 48 प्रवासी विविध ट्रॉलीमध्ये अडकले आहेत. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे. या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून एकूण 8 प्रवासी गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.
देवघर जिल्ह्यातील मोहनपूर ब्लॉक अंतर्गत त्रिकुट पर्वतावरील रोपवेमध्ये अचानक बिघाड झाल्यानं अनेक पर्यटक ट्रॉलीमध्ये अडकले. त्यांना सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी एनडीआरएफचं पथक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. रोपवेमध्ये अडकलेल्या पर्यटकांना संयम राखण्याचं आवाहन सातत्याने केले जात आहे.