मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा बावीसावा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात नवी मुंबईच्याच डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सने २३ धावांनी जिंकला. आणि गुणतक्त्यात पहिले गुण जमा केले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चेन्नईकडून खेळाची सुरूवात करायला ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उतप्पा उतरले. दोघांच्याही टप्प्यात चेंडू येत होता आणि ते धावा वसूल करत होते. जोश हेझलवुडने ऋतुराजला १७ धावांवर पायचित टिपले. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर एक धाव चोरण्याच्या प्रयत्नात मोईन अली बाद झाला. सुयश प्रभूदेसाईने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत दिनेश कार्तिककडे चेंडू फेकला आणि कार्तिकने क्षणाचाही विलंब न लावत यष्ट्या उध्वस्त केल्या. त्याच्याजागी शिवम दुबे नावाचं वादळ आलं. रॉबीन आणि शिवम जणू रनमशिन झाले होते. दोघांनाही चेंडूं भला मोठा दिसत होता आणि त्यावर ते मनाप्रमाणे धावा जमा करत होते. दोघांनी साधारण ११ षटकांमध्ये १६५ धावांची भागीदारी केली. वाणींदू हसरंगाने १९व्या षटकात रॉबीनला बाद केले. पण रॉबीन आपलं काम चोख बजावून गेला होता. त्याने ४ चौकार आणि ९ षटकारांच्या सहाय्याने केवळ ५० चेंडूंत ८८ धावा काढल्या. चेन्नई २०१/३ अशा भक्कम अवस्थेत होता. पुढच्याच चेंडूंवर कर्णधार रवींद्र जडेजाला वाणींदू हसरंगाने शून्यावर परत पाठवले. अनुज रावतने हवेत झेपावत सुंदर झेल टिपला. डावाच्या अखेरच्या षटकात शिवमला साथ देण्यासाठी महेंद्रसिंग धोनी उतरला. पण शिवमने त्या षटकात एकट्यानेच १५ धावा काढल्या. आणि चेन्नईच्या नावावर २१६/४ दिसू लागले. शिवमने ५ चौकार आणि ८ षटकारांच्या सहाय्याने केवळ ४६ चेंडूंत बिनबाद ९५ धावा काढल्या. त्याचं शतक पूर्ण न झाल्याचं दुःख सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस आणि अनुज रावत उतरले. महेश ठिकशानाने फाफ ड्यू प्लेसिसला झटपट बाद केले. त्याच्या जागी विराट कोहली खेळपट्टीवर उतरला. पण मुकेश चौधरीने त्याला केवळ एका धावेवर तंबूची वाट दाखवली. ग्लेन मॅक्सवेल धावसंख्येला आकार देऊ लागला. ६व्या षटकाच्या अखेरीस महेश ठिकशानाने अनुजला १२ धावांवर पायचित टिपले. रवींद्र जडेजाने ग्लेन मॅक्सवेलचा त्रिफाळा उध्वस्त केला. बेंगळुरू ७व्या षटकात ५०/४ अशा दयनीय अवस्थेत पोहचले. शाहबाझ अहमद आणि सुयश प्रभूदेसाई धावसंख्येला सुंदर आकार देऊ लागले. महेश ठिकशानाने सुयश प्रभूदेसाईचा त्रिफाळा उध्वस्त केला. त्याने ५ चौकार आणि एक षटकार यांच्या सहाय्याने केवळ १८ चेंडूंमध्ये ३४ धावा काढल्या. महेश ठिकशानाने पुढच्याच षटकात शाहबाझ अहमदचा त्रिफाळा उध्वस्त केला. त्याने चार चौकारांच्या सहाय्याने २७ चेंडूंत ४१ धावा काढल्या. दिनेश कार्तिक धावांचा वेग वाढवू पहात होता. पण वाणींदू हसरंगाला रवींद्र जडेजाने झटपट बाद केले. त्याच षटकात जडेजाने आकाश दीपला शून्यावर परत पाठवले. बेंगळुरू १६व्या षटकात १४६/८ आणि विजयापासून फारच दूर होते. १८व्या षटकात ड्वेन ब्राव्होने दिनेश कार्तिकला बाद केले. कार्तिकने दोन चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने केवळ १४ चेंडूंत ३४ धावा काढल्या. बेंगळुरूच्या विजयासाठीच्या उरल्यासुरल्या आशाही संपल्या. महंमद सिराजने बिनबाद १४ धावा काढल्या. जोश हेझलवुडने बिनबाद ७ धावा काढल्या. बेंगळुरूचा डाव २० षटकांच्या अखेरीस १९३/९ असा आटोपला होता. बेंगळुरूच्या महत्त्वाच्या फलंदाजानी नांगी टाकली नाहीतर निकाल वेगळा लागू शकला असता. आज चेन्नईचा दिवस होता. आणि धावसंख्येचा डोंगर दाखवून बेंगळुरूवर मानसिक दबाव निर्माण केला होता. २३ धावांच्या फरकाने चेन्नईने सामना जिंकून दोन गुणही खात्यावर लावले.
शिवम दुबेला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने बिनबाद ९५ धावा काढल्या होत्या.
उद्याचा सामना मुंबई इंडिअन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर रंगणार आहे. चैन्नई प्रमाणे मुंबई देखील पहिला विजय मिळवणार का याचं औस्त्युक्य आहे. तर पंजाब तिसरा विजय मिळवून अव्वल ३ जणांमध्ये पोहचण्यासाठी उत्सुक आहे.