यावल | २४वर्षीय आदिवासी तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील गाडऱ्यात गावात घडलीय. फुगली भाया बारेला असे मृत तरुणीचे नाव आहे.
फुगली बारेला ही कुटुंबीयांसह गाड्ऱ्या येथे वास्तव्यास होती. ती सकाळी ९ वाजता शेतात तूर कापण्यासाठी शेतात गेली. तेथे तिला विषारी सापाने दंश केल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच भरत बारेला, पोलिस पाटील तेरसिंग बारेला व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तिचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणून तेथे शवविच्छेदन करण्यात आले. अकस्मात मृत्यूची नाेंद झाली.
खराब रस्त्यामुळे लागले तब्बल १२ तास
गाडऱ्या गाव हे अतिदुर्गम भागातील आदिवासी गाव असल्याने मृतदेह आणण्यासाठी खाजगी वाहनाने ८० कि.मी. अंतर पार करण्यासाठी सहा तास लागले. रस्ता प्रचंड खराब असल्याने येण्या-जाण्यासाठी १२ तासांचा वेळ लागला.