धुळे :- दुचाकी अपघात प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कारवाई टाळण्यासाठी तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकारताना एकाला अटक करण्यात आली तर दुसऱ्या हवालदाराला सापळ्याचा संशय येताच तो फरार झाला. धुळे एसीबीच्या कारवाईने पोलीस दलातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. बुधवार, 27 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.हिरालाल देविदास पाटील (43, रा. प्लॉट. नं.66, हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर) असे अटकेतील हवालदाराचे तर प्रवीण विश्वास पाटील (45, रा. पोलीस लाईन, बसस्थानकाजवळ, पारोळा) असे पसार हवालदाराचे नाव आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की 25 वर्षीय तक्रारदार हे गुरुवार, 7 नोव्हेंबर रोजी पारोळा ते धरणगाव जात असताना त्यांच्या मोटारसायकलची धडक समोरील मोटारसायकलीला बसल्यानंतर एकाचा मृत्यू ओढवला होता. तक्रारदाराविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी हिरालाल पाटील व प्रवीण पाटील यांनी 30 हजारांची लाच मागितली.
तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. हिरालाल पाटील यांनी प्रवीण पाटील यांना फोन करीत त्यांच्याकडे लाच रक्कम देण्यास सांगितल्यानंतर लाच रक्कम देताच त्यांना अटक करण्यात आली तर हवालदार हिरालाल पाटील पसार झाले. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्यानंतर दोघांविरोधात पारोळा पोलिसात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली यशस्वी कारवाई
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, शिपाई रामदास बारेला, प्रवीण पाटील आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.