मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पुन्हा एकदा मोठा झटका दिलाय.
ईडीने नवाब मलिक यांच्या मालमत्तांवर टाच आणली असून त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे. राज्यभरातील एकूण 9 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
त्यात मुंबईसह उस्मानाबादेतील 148 एकर शेतजमिनीचाही समावेश आहे. ईडीकडून ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणात करण्यात आलीय. मलिकांचे मुंबईतील एकूण 5 फ्लॅट जप्त करण्यात आलेत. त्यात कुर्ल्यातील 3 तर वांद्रे परिसरातील 2 फ्लॅटचा समावेश आहे. नवाब मलिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयंशी संबंधित असलेल्या मेसर्स सोडियम इनवेस्टमेन्ट प्रायवेट लिमिटेड आणि मेसर्स मलिक इन्फ्रान्स्ट्रकचर या कंपनीच्याही मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
नवाब मलिक यांच्यावरील ही कारवाई महाविकास आघाडीसाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ईडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, प्रताप सरनाईक, प्राजक्त तनपुरे आणि संजय राऊत यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणली होती. तर प्राप्तीकर विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांची मालमत्ता जप्त केली होती.