एरंडोल :- राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या ठिकाणी जानेवारी 2025 मध्ये संपन्न होणार असून या परिषदेच्या यशस्वीते करिता जिल्हाभर तसेच राज्यभर व्यापक मोर्चे बांधणी सुरू आहे. राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे संयोजक तथा समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये समिती स्थापन करण्याचे कार्य सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव शहर व तालुका समिती स्थापन करण्याकरिता महत्त्वपूर्ण सभा पद्मालय विश्रामगृह जळगाव या ठिकाणी 30 नोव्हेंबर रोजी शनिवारी साहित्यिक डॉक्टर मिलिंद बागुल यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता संपन्न झाली.
भारतीय संविधानाच्या स्वीकृतीस 75 वर्षे पूर्ण झाली असून भारतीय संविधान लागू झाल्यास सुद्धा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. आज जगामध्ये अनेक देशांमध्ये यादवी माजलेली असताना भारत मात्र भारतीय संविधानामुळे एक संघ, अखंड व अभेद्य उभा आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या संविधानाची माहिती देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत होणे गरजेचे आहे. त्यामुळे या संदर्भात संपूर्ण राज्यभर व्यापक जनजागृती केली जात असून ‘घर घर संविधान’ मोहीम राबवली जात असल्याचे संयोजक भरत शिरसाठ यांनी सांगितले. या मोहिमेंतर्गत संविधान सन्मान परिषदेचे आयोजन करणे, विविध शासकीय -निमशासकीय कार्यालयांमध्ये शासकीय परिपत्रकाप्रमाणे संविधान साक्षरते संदर्भात कार्यशाळा घेणे, प्राथमिक ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, तसेच चर्चासत्रांचे आयोजन करणे, महिला प्रबोधन कार्यक्रम आयोजित करणे, शिक्षक संविधान जाणीव जागृती कार्यशाळा घेणे, पथनाट्य व कलापथकांच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत संविधाना संदर्भात जाणीव जागृती पोहोचविणे अशा विविध उपक्रमांचा समावेश या मोहिमेंतर्गत करण्यात आला असल्याचे भरत शिरसाठ यांनी सांगितले. संविधान सन्मान परिषदेची संपूर्ण रूपरेषा व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व समित्यांची माहिती त्यांनी सदर प्रसंगी मांडली. जात-धर्म व पक्षभेद या पलीकडे जाऊन संविधानावर प्रेम करणाऱ्या सर्वच क्षेत्रातील लोकांना यामध्ये सहभागी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मांडणी करताना डॉक्टर मिलिंद बागुल यांनी ‘संविधानाचा सन्मान’ हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे नमूद केले. संविधानाचे भान देशातील प्रत्येक नागरिकाला असले पाहिजे आणि या संविधानाचे संरक्षण सुद्धा करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी आग्रहाने मांडले. संविधानाचे महत्त्व समाजातील सर्व स्तरांच्या आता लक्षात आले असून राजकीय दृष्ट्या सुद्धा संविधानाचे महत्व अधोरेखित झाले असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान सन्मान परिषदेच्या यशस्वीते करिता सर्वांनी हातभार लावावा व या मोहिमेमध्ये सहयोग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सदर प्रसंगी साहित्यिक व संविधानाचे अभ्यासक जयसिंग वाघ यांनी प्रतीगामी शक्ती भारतीय संविधानास संपविण्याचे कारस्थान करीत असताना संविधान वाचवण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे नमूद केले. केंद्रीय मानवाधिकार संघटनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर विजयकुमार कस्तुरे यांनी घरघर संविधान मोहिमेंतर्गत कला पथकाची निर्मिती करून कलापथकाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे सांगितले. मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष राम पवार, डॉक्टर डी. व्ही. खरात, डॉक्टर बबन महामुने, अंकुश पडघान, बाणाईचे प्रमुख आर.जे. सुरवाडे, माजी उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे कोअर कमिटी सदस्य धनराज मोतीराय, प्राध्यापक डॉक्टर सत्यजित साळवे, डॉक्टर अशोक सैंदाणे इत्यादींनी संविधान सन्मान परिषदेच्या यशस्वीते करिता उपस्थितांना मार्गदर्शन केले. बापूराव पानपाटील सर, समता शिक्षक परिषदेच्या सचिव वर्षा अहिरराव, शैलेश नन्नवरे, महेश तायडे सर, विवेक सैंदाणे इत्यादींनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. समता शिक्षक परिषदेच्या पूर्व विभाग जिल्हाध्यक्षा सरिता वासवानी यांनी संविधान सन्मान परिषदेच्या यशस्वीते करिता जिल्ह्यातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याचे सांगितले.
सदर प्रसंगी डॉक्टर डी.व्ही खरात यांची राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद बुलढाणा जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आली. विद्यानिकेतनचे माध्यमिक शिक्षक व शाहीर ईश्वर वाघ यांची जळगाव शहर व तालुका शिक्षक समन्वय समिती प्रमुख पदी निवड करण्यात आली. इंजिनीयर आर.जे. सुरवाडे यांची संविधान सन्मान परिषद कवी संमेलन नियोजन समिती प्रमुख पदी तसेच इंजिनियर विभाग जळगाव जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली. चित्र पगारे, ज्योती वाघ यांची कवी संमेलन नियोजन समिती सदस्य पदी निवड करण्यात आली. जळगाव एसटी आगाराचे चालक शैलेश नन्नवरे यांची एसटी आगार कर्मचारी विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली. बापूराव पानपाटील, मच्छिंद्र अडकमोल, विनोद रंधे, भिमराव सपकाळे, जितेंद्र सोनवणे, सुधाकर मेढे, जगदीश सपकाळे, आ.बा.सपकाळे, वर्षा अहिरराव, प्रज्ञा तायडे इत्यादींची जळगाव शहर व तालुका समन्वय समिती सदस्य पदी निवड करण्यात आली.
डॉक्टर विजयकुमार कस्तुरे यांच्या ‘शाहू राजा’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. डॉक्टर अशोक सैंदाणे, आर.जे. सुरवाडे, विवेक सैंदाणे यांनी सभेच्या यशस्वीतेकरिता परीश्रम घेतले. संविधान सन्मान परिषदेचे कोअर कमिटी सदस्य डॉक्टर अशोक सैंदाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.