प्रसूतीसाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भवती मातेच्या तडफडून मृत्यू; पोटातील बाळही दगावले.

Oplus_131072
Spread the love

डहाणू :- वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका लाडक्या बहिणीला हकनाक जीव गमवावा लागला आहे.सारणी गावातील पिंकी डोंगरकर या गर्भवती मातेच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतानाच आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र संतापही व्यक्त होत आहे.

दुपारी प्रसूती वेदना जाणवू लागल्याने नातेवाईकांनी पिंकीला प्रथम कासा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याने डॉक्टरांनी तिला प्रसूतीसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र उपचारापूर्वीच प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तातडीचे प्राथमिक उपचार करून गर्भवतीला गुजरातच्या वलसाडला पाठवण्याचा निर्णय घेतला. यावेळी 108 क्रमांकाच्या आपत्कालीन रुग्णवाहिकेची मदत घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र ऑक्सिजनसह अत्यावश्यक सुविधांचा अभाव असल्याने रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाली नाही. यामध्ये बराच वेळ गेला. रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर पिंकीला बलसाड येथील खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय झाला. मात्र अॅम्ब्युलन्समध्ये कार्डियाक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने वापीच्या पुढे रुग्णवाहिकेतच तिचा जीव गेला. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने आणि योग्य उपचाराअभावी गर्भवती मातेला जीव गमवावा लागला.

108 रुग्णवाहिका असते कुठे?

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वारंवार अपघात होतात. गंभीर रुग्णांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. गावपाड्यातून प्रसूतीसाठी येणाऱ्या मातांना अत्यावश्यक म्हणून इतर रुग्णालयात दाखल करावे लागते. यासाठी एक कायमस्वरूपी 108 रुग्णवाहिका कासा उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक असताना आरोग्य विभाग मात्र लक्ष देत नाही.

पीएम रिपोर्टची प्रतीक्षा

गर्भवती पिंकी डोंगरकर यांना बेशुद्ध अवस्थेत कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वलसाडला पाठवले होते अशी माहिती पालघरचे सिव्हिल सर्जन डॉ. रामदास मराड यांनी दिली, तर गर्भवती मातेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा पीएम रिपोर्ट आल्यानंतरच होईल असे कासा येथील डॉ. संदीप वाघमारे यांनी सांगितले.

“अजूनही खेड्यापाड्यात महिलांना योग्य उपचार वेळेवर मिळत नाहीत. आरोग्यविषयक सुविधा खेडोपाडी पोहोचाव्यात यासाठी सरकार काहीही करत नाही. लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारचे बेगडी प्रेम आहे.”

– विनोद निकोले, आमदार, पिंकी डोंगरकर

मुख्य संपादक संजय चौधरी