यावल प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगरकठोरा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विक्रम लालू भिरूड यांनी गावालगत असलेल्या शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
विक्रम लालू भिरूड हे डोंगरकठोरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते. तसेच ते शेतकरी आहे. काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते अचानक घरातून बाहेर निघाले आणि गावालगत असलेल्या दिलीप भिरूड यांच्या शेत विहिरीत उडी घेतली.
प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच या घटनेची माहिती पोलिस पाटील राजरत्न आढाळे यांनी यावल पोलिसांना दिली. विहिरीत विक्रम भिरूड यांचा शोध घेण्यात आला. मात्र तत्पूर्वीच पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. रात्री नऊ वाजता त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांकडे सोपवला.
दरम्यान, मृत भिरूड यांनी आत्महत्या का केली, याचे कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी यावल पोलिसांत सुनील भिरूड यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार अशोक जावरे, किशोर परदेशी करत आहे.