मुंबई :- एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोट बुडाली असून या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृ्त्यू झाला आहे. नौदलाच्या स्पीडबोटीने प्रवाशी बोटीला धडक दिल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे.उशीरापर्यंत या दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू होते. हा अपघात झाल्यानंतर आता या धडकेचा व्हिडीओ समोर आला आहे. १३ जणांचा जीव घेणाऱ्या या दुर्घटनेत दोन बोटींची धडक झाली तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटी स्पीडबोट पाण्यात ४-५ प्रवाशांना घेऊन जातामा दिसत आहे.ती बोट काही अंतरावरून यू-टर्न घेते आणि वेगाने प्रवासी बोटीकडे येते. शेवटच्या क्षणी दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न होतो पण दोन्हींची धडक होते. या धडकेनंतरच प्रवासी बोट बुडण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसऱ्या राऊंडला बोट धडकली
गेटवे ऑफ इंडिया येथून दुपारी सव्वा तीनच्या सुमारास नीलकमल नावाची बोट 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाकडे निघाले. गेटवे ऑफ इंडियापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर गेली असता 3 वाजून 55 मिनिटांनी चेकिंगसाठी काढली.नौदलाच्या स्पीड बोटीला नवं इंजिन लावलं होतं. त्याची चाचणी सुरू होती. त्याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरील नियंत्रण सुटल्याने नौदलाच्या स्पीड बोटने नीलकमल बोटीला धडक दिली. तत्पूर्वी एक राऊंड या बोटीने घातला आणि दुसऱ्या राऊंडला ही बोट धडकली. स्थानिक मच्छीमारांच्या बोटी तसेच पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटीने ताबडतोब या ठिकाणी पोहोचून मदत कार्य सुरू केले. प्रवाशांना या बोटी बसवून उरण तसेच मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे तसेच भाऊचा धक्का येथे आणण्यात आले.
सखोल चौकशी करण्यात येणार
101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. 13 जणांना मृत घोषित केलं. 3 नौदलातील आणि 10 प्रवासी आहेत. त्यातील दोन जण गंभीर आहे. अजूनही शोध कार्य सुरू आहे
फडणवीसांनी दिली माहिती…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, अरबी समुद्रातील बुचर आयलंड परिसरात ‘नीलकमल’ कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. यानंतर बोटीवरील १०१ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. नौदलाचे व्हाइस अॅडमिरल संजय जगजीतसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडे सात पर्यंत १३ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ३ नौदलाचे कर्मचारी आहेत तर १० नागरिक आहेत. दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नौदल, कोस्ट गार्ड आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. मात्र या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला याबद्दलची आकडेवारी उद्यापर्यंत उपलब्ध होईल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून केली जाईल अशी घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दुर्घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदलाकडून केली जाईल असेही फडणवीस म्हणाले आहेत.