मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा सविस्सावा सामना मुंबई इंडिअन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. लखनौ सुपर जायंट्सने १८ धावांनी सामना जिंकला. मुंबई इंडिअन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. लखनौ सुपर जायंट्सकडून डावाची सुरूवात करायला कर्णधार के. एल. राहुल आणि क्विंटन डीकॉक उतरले. बघता बघता दोघांनी ५० धावांची भागीदारी रचली. फॅबिअन अलेनने क्विंटन डीकॉकला २४ धावांवर पायचित टिपले. के. एल. राहुल आणि मनीष पांडे यांनी देखील ७० धावांची भागीदारी रचली. मुरुगुन अश्विनने मनीष पांडेच्या ३८ धावांवर यष्ट्या उध्वस्त केल्या. मार्कस स्टॉईनसला जयदेव उनाडकटने झटपट परत पाठवले. दीपक हुडाला जयदेव उनाडकटने १५ धावांवर तंबूत पाठवले. सामन्याच्या पहिल्या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी केलेल्या कर्णधार के. एल. राहुलने ९ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने केवळ ६० चेंडूंत बिनबाद १०३ धावा काढल्या. आणि मोसमातले पहिले शतक झळकावले. त्याने आयपीएलमध्ये आजवर ३ शतकं काढली आहेत. लखनौने मुंबई समोर विजयासाठी २०० धावांचा डोंगर ऊभा केला.
मुंबई इंडिअन्सकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन उतरले. रोहित शर्माला आवेश खानने ६ धावांवर बाद केले. डिवाल्ड ब्रेव्हिजने केवळ १३ चेंडूंत ३१ धावा काढल्या. त्याला आवेश खानने बाद केले. संथगतीने खेळत असलेल्या ईशान किशनचा मार्कस स्टॉईनसने त्रिफाळा उध्वस्त केला. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा जोडी चांगली जमली होती. दोघांनी ६४ धावांची भागीदारी केली. तिलक वर्माला जेसन होल्डरने बाद केले. पाठोपाठ सूर्यकुमार यादवलाही ३७ धावांवर रवी बिश्नोईने बाद केले. किरॉन पोलार्ड फलंदाजी उतरला. मुंबईच्या उरल्यासुरल्या आशा त्याच्यावर होत्या. फॅबिअन अलेनला आवेश खानने झटपट बाद केले.
डावाचं २०वं षटक दुष्मंथा चमिराने टाकलं. हे षटक नाट्यमय ठरले. पहिल्याच चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात जयदेव उनाडकट धावबाद झाला. मुरुगुन अश्विनने दुसर्या चेंडूवर आल्या आल्या षटकार खेचला. तिसर्या चेंडूवर मुरुगुन अश्विन धावबाद झाला. पाचव्या चेंडूवर किरॉन पोलार्डही बाद झाला. २० षटकांच्या अखेरीस मुंबई इंडिअन्स १८१/९ इतकीच मजल गाठू शकला. आणि लखनौ ठरले सुपर जायंट्स.
के. एल. राहुलला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने १०३ धावा काढून महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं.