टाटा आयपीएल – बेंगळुरूचा रॉयल विजय

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा आजचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १६ धावांनी सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून डावाची सुरूवात करायला कर्णधार फाफ ड्यूप्लेसिस आणि अनुज रावत उतरले. शार्दूल ठाकूरने अनुज रावतला शून्यावर परत पाठवले. खलील अहमदने फाफ ड्यूप्लेसिसचा अडसर दूर केला. विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल जोडी चांगली जमली होती.

पण एक धाव घेण्याच्या नादात विराट कोहली धावबाद झाला. सुयश प्रभूदेसाईला अक्षर पटेलने लगेच परतीचं तिकिट दिलं. ग्लेन मॅक्सवेलला ५५ धावांवर कुलदीप यादवने बाद केले. शाहबाझ अहमद आणि दिनेश कार्तिक यांनी पुढच्या ५२ चेंडूंत धावांचा पाऊस पाडला. त्यांनी ९७ धावांची भागीदारी केली. त्यात शाहबाझ अहमदने ३ चौकार आणि एक षटकार यांच्या सहाय्याने २१ चेंडूंत बिनबाद ३२ धावा काढल्या. तर विस्फोटक फलंदाज दिनेश कार्तिकने प्रत्येकी ५ चौकार आणि षटकार यांच्या सहाय्याने ३४ चेंडूंत ६६ धावा काढल्या. २०व्या षटकाच्या अखेरीस रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू १८९/५ स्थिरावला.

दिल्ली कॅपिटल्स कडून डेव्हिड वॉर्नरने ६६ धावा काढल्या. कर्णधार ऋषभ पंतने ३४ धावा काढल्या. शार्दूल ठाकूर १७ तर पृथ्वी शॉने १६ धावा काढल्या. बाकीच्या फलंदाजांकडून विशेष योगदान मिळाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स २०व्या षटकाच्या अखेरीस १७३/७ इतकीच मजल गाठू शकला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १६ धावांनी सामना जिंकला.
दिनेश कार्तिकला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने बिनबाद ६६ धावा काढून महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं.
उद्याचा पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात नवी मुंबईच्या डी. वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. तर दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई दुसरा विजय मिळवून इतर संघांना सावधानतेचा इशारा देणार का, हा औस्त्युकाचा विषय आहे.

टीम झुंजार