छत्रपती संभाजीनगर :- सध्या सोशल मीडियावर स्टार्सची संख्या दिवसागणित वाढत चालल्याचं चित्र दिसत आहे. प्रत्येकाला आपली प्रतिष्ठा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडावी वाटते. मग तो राजकीय नेता असो वा गावची उनाड पोरं… अशातच आता छत्रपती संभाजीनगर एक मोठी माहिती समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर चुकीचे व्हिडिओ शेअर केल्याने पोलिसांनी तरुणांना चांगलीच अद्दल घडवल्याचं पहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड परिसरात हुल्लडबाज तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
इंस्टाग्रामवर रिल्स काढून दहशत
छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड परिसरात हुल्लडबाज तरुणांकडून इंस्टाग्रामवरती रिल्स काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हातात धारदार शस्त्र घेऊन सोशल मीडियावर रिल्स काढण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ इंस्टाग्रामवर या तरुणाच्या रील पाहून या तरुणांना ताब्यात घेतले आहे. या रीलमध्ये काही तरुण कमरेला कट्टा, हातात कोयता, धारदार शस्त्र घेऊन, कॉलर उडवत इंस्टाग्राम वरती रील व्हायरल करत होते.
पोलिसांनी भाईगिरी उतरवली
इन्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता. पाचोड पोलिसांनी यांना ताब्यात घेतले असून, या तरुणांची पाचोड येथील पाचोड पैठण चौकातून धिंड काढत पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. इंस्टाग्रामवर भाईगिरी करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी चौकातून धिंड काढत भाईगिरी उतरवली. त्यावेळी कॉलर उडवणाऱ्या तरुणांची मान शरमेने खाली गेलेल्याचं दिसून आलं.
कोल्हापूरात गुंडांचा हैदोस
दरम्यान, कोल्हापूरात देखील गेल्या काही दिवसांपासून गुंडांनी अक्षरशः हैदोस घातल्याचं दिसून येतंय. निरपराध तरुणांची हत्या करण्यापर्यंत हे गुंड पोहोचले आहेत. इन्टाग्राम स्टेटसवर चितवणीखोर रील्स लावून एका तरुणाची हत्या करण्यापर्यंत या गुंडांची मजल गेलेल्याचं पहायला मिळालं होतं.हातात कोयते, तलवारी घेऊन नागरिकांना धमकावण्याचे प्रकार समोर आला होता.