ट्रेलरची टॅक्सीला जोरात धडक; भीषण अपघातात भारताच्या १८ वर्षीय उदयोन्मुख टेबल टेनिसपटूचा दुर्देवी मृत्यू

Spread the love

नवी दिल्ली : तामिळनाडूमधील विश्वा दिनदयालन नावाच्या उदयोन्मुख टेबल टेनिसपटूचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी गुवहाटीवरुन शिलाँगला येत असताना विश्वा ज्या टॅक्सीने प्रवास करत होता त्या टॅक्सीचा अपघात झाला. यामध्येच विश्वाचा उपचाराला घेऊन जात असताना मृत्यू झाल्याची माहिती टेबल टेनिस फेड्रोशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात दिली आहे.

विश्वा हा त्याच्या तीन संघ सहकाऱ्यांसोबत ८३ व्या वरिष्ठ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय टेबल टेनिस चॅम्पियनशीपसाठी शिलाँगला जात असतानाच हा अपघात झाला. आजपासून ही स्पर्धा सुरु होत आहे. विश्वासोबत प्रवास करणारे रमेश संतोष कुमार, अभिनाष श्रीनिवासन आणि किशोर कुमार या तिघांना गंभीर दुखापत झाली असली तरी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीआहे.

“समोरुन येणाऱ्या १२ चाकी ट्रेलरने दुभाजक ओलांडून टॅक्सीला धडक दिली. शहनबंगाल येथे ही घटना घडली. या धडकेमुळे टॅक्सी दरीमध्ये कोसळली,” असे  टीटीएफआयने सांगितले, या अपघातामध्ये टॅक्सी चालकाचाही जागीच मृत्यू झाला असून विश्वाला उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. नॉर्थ इस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ अॅण्ड मेडिकल सायन्सेसच्या डॉक्टरांनी विश्वाला मृत घोषित केले.

मेघालय सरकारच्या मदतीने आयोजकांनी विश्वा आणि त्याच्या सहकाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले. विश्वा हा टेबल टेनिसमधील भावी पिढीतील आघाडीचा खेळाडू होता. त्याने अनेक पदकं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्यात. तो ऑस्ट्रियामध्ये २७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या जागतिक टेबल टेनिस युथ कंटेंडर स्पर्धेत सहभागी होणार होता. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनीही विश्वाच्या निधनाबद्दल खेद व्यक्त केला आहे. “दिनदयालन विश्वाच्या मृत्यूसंदर्भात ऐकून वाईठ वाटलं,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

टीम झुंजार