“पप्पानं मम्मीला मारलं” ४ वर्षांच्या मुलीने काढलं चित्र, सासरच्यांकडून आत्महत्येचा केला होता दावा, विवाहितेचा संशयास्पद होता मृत्यू,

Spread the love

झांसी :- आईला गळा दाबून मारण्यात आलं, त्यानंतर तिला पंख्याला लटकवण्यात आलं. चार वर्षांच्या चिमुरडीने चित्र काढून घडलेला हा सगळा प्रकार सांगितला. चित्रामध्ये आईचा गळा दाबणारा तो माणूस कोण आहे? हे विचारल्यानंतर चिमुरडीने जे उत्तर दिलं ते ऐकून तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. चार वर्षांच्या मुलीसमोरच तिचे वडील आईची हच्या करत होते. हत्या केल्यानंतर वडिलांनी मृतदेहाच्या गळ्याला दोर लावला आणि दोराच्या सहाय्याने मृतदेह छतावरच्या पंख्याला लटकवला. मुलीने आपले वडीलच आईची हत्या करत असल्याचं स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं, पण घाबरल्यामुळे तेव्हा ती काहीही बोलली नाही. यानंतर पोलीस घरी आले. मुलीच्या वडिलांनी आपल्या पत्नीने स्वत:हून जीवन संपवल्याचा जबाब पोलिसांना दिला, पण या चार वर्षांच्या मुलीने एक चित्र काढलं, ज्यामुळे या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला आहे.

वीस लाख हुंडा दिला तरी…

सोनाली यांचे वडील संजीव त्रिपाठी मध्ये प्रदेशमध्ये राहतात. ते म्हणाले, २०१९ साली माझ्या मुलीचे लग्न झाले. तेव्हापासून दोघांच्याही नात्यात तणाव होता. लग्नाच्या दिवशी आम्ही मुलाकडच्या मंडळींना २० लाख रुपयांचा हुंडा दिला होता. पण त्यानंतरही संदीप आणि त्याचा परिवार नवनव्या मागण्या करत राहिला. त्यांना नवी चारचकी हवी होती. मी त्यांना सांगितले की, हे माझ्या ऐपतीबाहेरचे आहे. तरीही त्यांनी माझे न ऐकता माझ्या मुलीला त्रास देण्यास सुरूवात केली. यावरून मी एकदा पोलिसांत तक्रार दिली होती, त्यानंतर आमच्यात समेट घडवून आणण्यात आला होता.

मुलीने काढलं आईच्या हत्येचं चित्र

ही मुलगी फक्त 4 वर्षांची आहे. या वयात मुलं कागद आणि पेन्सिल घेऊन वेड्या-वाकड्या रेषा काढतात, पण या मुलीने स्वत:च्याच आईच्या हत्येचं चित्र काढलं, जे तिने स्वत:च्या डोळ्यांनी बघितलं होतं. या फोटोमध्ये मुलीने आईचे दोन्ही हात बरोबर काढले आहेत, पण आईच्या गळ्याच्या उजवीकडे मुलीने आणखी एक हात काढला आहे. चित्रामधला हा तिसरा हात आहे, पण यात फक्त हातच दिसत आहे, मुलीने कोणाचाही चेहरा काढलेला नाही.मुलीने चित्रामध्ये दाखवलेला हा तिसरा हात तिच्याच वडिलांचा आहे. कारण तिने आपल्याच वडिलांनी आईची गळा घोटून हत्या केल्याचं स्वत:च्या डोळ्याने पाहिलं होतं. तेच चित्र मुलीने एका कागदावर काढलं. यानंतर मुलीने आणखी एक चित्र काढलं, या चित्रात मुलगी आईला अग्नी देत असल्याचं तिने दाखवलं आहे. वडील आईच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत म्हणून आपल्यालाच अंत्यसंस्कार करायला लागल्याचं मुलीने या चित्रातून सांगितलं.

मुलीचे वडील मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह

या मुलीच्या वडिलांचं नाव संदीप बुधौलिया आहे. संदीप एका औषधाच्या कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह आहे. 27 फेब्रुवारी 2019 ला सोनाली आणि संदीपचं लग्न झालं. सोनाली मध्य प्रदेशच्या टीकमगढ जिल्ह्याची रहिवासी होती. लग्नामध्ये सोनालीच्या वडिलांनी संदीपला 20 लाख रुपये हुंडा म्हणून दिला होता, पण संदीपला हुंड्यासोबत गाडीही पाहिजे होती. गाडी मिळाली नाही म्हणून सोनालीवर सासरी अत्याचार केले गेले. तीन वर्ष हे अत्याचार सुरू राहिले, यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला.

17 फेब्रुवारीला दिली मृत्यूची बातमी

14 फेब्रुवारीला मामाच्या मुलाचं लग्न असल्यामुळे सोनाली मुलीसोबत 12 फेब्रुवारीलाच घरातून गेली. लग्नाच्या एक दिवसानंतर संदीपने सोनालीला फोन केला आणि आज घरी आली नाहीस तर परत कधीही येऊ नकोस, अशी धमकी दिली. यानंतर सोनाली 16 फेब्रुवारीला घरी आली. यानंतर 17 फेब्रुवारीला सकाळी संदीपने सोनालीच्या माहेरी फोन करून, तिने जीवन संपवलं असल्याचं सांगितलं.

मुलीने आजी-आजोबांना सांगितली कहाणी

मुलीचा मृत्यू झाल्याचं समजताच सोनालीचे आई-वडील झांसीला आले. रोजच्या भांडणाला कंटाळून सोनालीने जीवन संपवल्याचं तिच्या आई-वडिलांना सांगण्यात आलं. संदीपने पोलिसांनाही हेच सांगितलं. पण तेव्हाच चार वर्षांच्या नातीने आजी-आजोबांना चित्राच्या माध्यमातून सगळं सत्य सांगितलं. हे चित्र पाहून आजी-आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी लगेचच पोलिसांना याची माहिती दिली.

मृतदेहावर ऍन्टीमॉर्टम जखमा

मुलीने चित्राच्या माध्यमातून सगळं सांगितलं तोपर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला होता. सोनालीचा मृत्यू गळफास लागल्याने झाल्याचं रिपोर्टमध्ये लिहिलं होतं, पण त्याचसोबत मृत्यूआधी सोनालीला ऍन्टीमॉर्टम जखमा झाल्याचंही रिपोर्टमध्ये लिहिण्यात आलं होतं. ऍन्टीमॉर्टम जखमा म्हणजे जिवंत असताना व्यक्तीवर अत्याचार केले जातात.

चित्र पाहिल्यानंतर पोलिसांनी मुलीचीही चौकशी केली. मुलीने काढलेलं ते चित्र पोलिसांना दाखवलं. पोलिसांनीही मुलीला विश्वासात घेऊन या चित्राचा अर्थ विचारला. तसंच चित्रातला तिसरा हात कुणाचा आहे? असा प्रश्न पोलिसांनी मुलीला विचारला. यानंतर मुलीने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी संदीपला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

हत्येआधी सोनालीला मारहाण

16 फेब्रुवारीच्या रात्री संदीपने सोनालीला बेदम मारहाण केली, यानंतर गळा घोटून तिची हत्या केली. सोनालीची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह पंख्याला लटकवला आणि सोनालीने स्वत:च आयुष्य संपवलं, असा बनाव रचला. चार वर्षांची आपली मुलगी झोपली असल्याचं संदीपला वाटत होतं, पण मुलगी सगळं बघत होती आणि अखेर मुलीनेच चित्र काढून या हत्याकांडाचा उलगडा केला.

मुख्य संपादक संजय चौधरी