शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 2.58 लाख कोटींचे नुकसान; निर्देशांक कोसळले

Spread the love

मुंबई – सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्देशांक दोन टक्‍क्‍यांपर्यंत कोसळल्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.58 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. आता शेअर बाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य कमी होऊन 269 लाख कोटी रुपये झाले आहे.

यासंदर्भात मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या संस्थेचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, द्धामुळे जागतिक बाजारात शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये किरकोळ किमतीवर आधारित महागाई 14.5 टक्‍क्‍यांवर गेली आहे. यामुळे इन्फोसिस आणि एचडीएफसी बॅंकेसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक कोसळले.

सोमवारी फक्त भारतीय शेअर बाजारात नुकसान झाले नाही तर दक्षिण कोरिया, चीन, हॉंगकॉंग, जपान, युरोप आणि अमेरिकन शेअर बाजार निर्देशांक कमी झाल्याचे दिसून आले. आता कच्च्या तेलाचे दर 111 डॉलरच्या पुढे गेले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवर वाढलेल्या कच्च्या तेलाचा जास्त नकारात्मक परिणाम होत असतो.

कारण परदेशी संस्थागत गुंतवणूकदार अशा परिस्थितीत भारतातून गुंतवणूक काढून घेतात. बुधवारी या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,061 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी समोर आली आहे. दरम्यानच्या काळामध्ये शेअर बाजार निर्देशांक कमी होत असतानाच महागाईचा सामना करण्यासाठी गुंतवणूकदार आता सोने आणि चांदीची खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये आगामी काळात गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्‍यता असल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले.

टीम झुंजार