यावल तालुक्यात लहानपणापासून सांभाळ केलेल्या भाचीने पळून प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाने भाचीवर धारदार शस्त्राने केला हल्ला.

Spread the love

नणंद ने हल्लेखोराचा प्रतिकार केल्याने वाचवला वहिनीचा जीव.महिलादिनी घडलेली घटना, मामाने केला गुन्हा कबूल

प्रतिनिधी | यावल

यावल :- लहानपणापासून सांभाळ केलेल्या भाचीने पळून जावून प्रेमविवाह केल्याने संतप्त झालेल्या मामाने केळी कापणीच्या धारदार शस्त्राने (बख्खी) तिच्यावर हल्ला केला. भाचीच्या मानेवर वार केले. हा प्रकार पाहून तरुणीची नणंद मदतीला धावली. हल्लेखोराचा प्रतिकार केल्याने तिचे हात आणि डोक्याला दुखापत झाली. हा गोंगाट पाहून मदतीला आलेल्या आजूबाजच्या रहिवाशांनी हल्लेखोर मामाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. ऐन महिलादिनी झालेल्या रक्तरंजीत प्रकाराने एकच खळबळ उडाली.

स्वप्निल साहेबराव सपकाळे हे पिंप्री (ता. यावल) येथे राहतात. त्यांचा शालक चेतन वासुदेव कोळी (रा.पाडळसे ता.यावल) आणि त्याची पत्नी वैष्णवी विनोद तायडे (वय १८, रा. उल्हासनगर, मुबंई) हे पिंप्री येथे आले होते. दरम्यान, चेतन आणि वैष्णवीने उल्हासनगर येथील घरून पलायन करून प्रेमविवाह केला. यानंतर ते पिंप्री येथे आल्याची माहिती वैष्णवीचा मामा उमाकांत चिंधू कोळी (रा.कोळीवाडा, पाडळसे) याला समजली. लहानपणापासून संगोपन केलेल्या भाचीने पळून जावून प्रेमविवाह केल्याच्या राग त्याच्या डोक्यात होता. यामुळे तो शनिवारी सकाळी ८.३० वाजता पिंप्री येथील स्वप्निल सपकाळे यांच्या घरात धडकला. तेथे भाची वैष्णवी समोर दिसताच तिच्यावर केळी कापण्याची कोयतासदृश हत्याराने हल्ला चढवला. तिची मान, कान आणि छातीवर दुखापत केली. वैष्णवीवर हल्ला होत असल्याचे पाहून तिची नणंद वैशाली स्वप्निल सपकाळे (वय २७) हिने उमाकांतचा प्रतिकार केला. या झटापटीत तिचे दोन्ही हात आणि डोक्याला दुखापत झाली. हा प्रकार आजूबाजूच्या रहिवाशांच्या नजरेस पडताच त्यांनी उमाकांतला पकडून चोप दिला. यावल पोलिसांच्या स्वाधीन केले. नंतर वैष्णवी व तिची नणंद वैशाली या दोघांना यावल ग्रामीण रूग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, डॉ. हर्ष पटेल, अधिपरिचारिका दीपाली किरंगे, प्रियतमा पाटील यांनी प्रथमोपचार केले. पण, वैष्णवीच्या मानेवर गंभीर जखमा असल्याने तिला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करणे सुरू होते.

चौकट

वैष्णवीला संपवायचं होतं, चेतनची मान छाटायची होती

यावल पोलिसांनी हल्लेखोर मामा उमाकांत कोळी याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत त्याने, मी वैष्णवीला लहानाचे मोठे केले. तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजताच तिला आई-वडिलांकडे उल्हासनगरला पाठवले. तो मुलगा तुझ्या योग्यतेचा नाही, असे सांगून सुद्धा तिने पळून जाऊन लग्न केले. या कृत्यामुळेच तिला संपवणार होतो. त्यासाठीच तिच्यावर हल्ला चढवला. तो मुलगा (चेतन) जर आधी दिसला असता तर त्याची मान छाटून टाकली असती, उमाकांतने सांगितले. दरम्यान, भाचीवर हल्ला केल्याचा कोणताही पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर नव्हता.

पळवुन केलं लग्न

उल्हासनगर येथून ६ मार्चला निघाली वैष्णवी

चेतन कोळी यांनी सांगितले की उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ राहणाऱ्या वैष्णवी तायडे हिला घेण्यासाठी आपण ६ मार्च रोजी गेलो होतो. ६ मार्चला सकाळी १० वाजेच्या सुमारास दोघे उल्हासनगर येथून निघून नाशिकला आलो. तेथील साई वैदिक विवाह संस्था (अशोकस्तंभ) येथे आम्ही विवाह केला. ७ मार्चला रात्री पिंप्री आलो. यानंतर ८ मार्चच्या सकाळी ही घटना घडली.

अशा आहेत गंभीर जखमा

या हल्ल्यात वैष्णवी तायडे हिच्या शरीरावर तीन जखमा झाल्या. छातीवर डाव्या बाजूला चंद्राकार आकाराची जखम आहे. पण, ती फारशी खोल नाही. मानेवर उजव्या बाजूने एक सेंटीमीटर खोल आणि १० सेंमी लांब आणि चार सेंमी रुंद आणि याच बाजूने कानापासून खाली चार सेमी लांब आणि ०.५ सेंमी रुंद अशी जखम असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

जखमी वैष्णवीवर जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहे. ती जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितल्याचे यावल येथील पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे यांनी सांगितले आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी पोलिसांच्या पथकाला जबाब घेण्यासाठी पाठवले होते.

मुख्य संपादक संजय चौधरी