मुजफ्फरपूर:- हिंदू रितीरिवाजांनुसार अमित कुमार आणि खुशबू कुमारी यांचं लग्न झालं. लग्नाआधी वर-वधू एकमेकांशी बोलले होते आणि या लग्नाने कुटुंबातील सर्वजण आनंदी होते. लग्नानंतर तीन दिवसांनी अमित कुमार हनिमूनला जाण्यासाठी तयार होता आणि खुशबूनेही तयारी केली होती.दोघेही एकत्र घरातून निघाले आणि मुजफ्फरपूर रेल्वे जंक्शनला पोहोचले. पण जंक्शनवरून नवरी गायब झाली. हा प्रकार बिहारमधील मुजफ्फरपूर येथे घडला.
नवरी गेली कुठे?
अमित कुमारने सांगितलं की, मुजफ्फरपूर रेल्वे जंक्शनला पोहोचेपर्यंत सर्व काही ठीक होतं. आम्हाला 24 फेब्रुवारीला बोकारो स्टील सिटीला जायचं होतं आणि जेव्हा आम्ही स्टेशनवर पोहोचलो, तेव्हा मी ट्रेनमध्ये जागा शोधण्यासाठी थोडं लवकर चाललो आणि काही पावलं पुढे गेल्यावर मागे वळून पाहिलं, तर खुशबू कुमारी तिथे नव्हती. रेल्वे स्टेशनवर आपली नवी नवरी नसल्याने अमित कुमारला काळजी वाटली. त्याने प्लॅटफॉर्मवर, ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर सर्वत्र शोधलं, पण खुशबू कुमारी सापडली नाही. त्यानंतर तो घरी परतला, कदाचित खुशबू तिथे आली असेल, असं त्याला वाटलं, पण त्याची नवरी तिथेही नव्हती.
मंदिरात लग्न झालं, पण…
सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी अमित कुमारने सांगितलं की, 21 फेब्रुवारीला जानकी मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झालं. सुरुवातीला तो सामाजिक भीतीमुळे गप्प राहिला, पण आता त्याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्याला माहिती मिळाली आहे की, खुशबू तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे आणि आता सारणमध्ये कुठेतरी राहत आहे. पोलिसांना दिलेल्या अर्जात अमित कुमारने म्हटलं आहे की, त्याची फसवणूक झाली आहे. अमितने खुशबू कुमारीवर आरोप केले आहेत. पोलीस म्हणाले की, प्रकरणाचा तपास सुरू आहे. दोघांचंही लग्न सीतामढीच्या जानकी मंदिरात झालं होतं आणि दोघांचंही हे दुसरं लग्न होतं.