बीड :- महिला दिनानिमित्त सत्कार करायचे सांगत पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार उद्धव गडकर यांनी महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटोदा पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे.
नेमंक काय घडलं?
पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार उद्धव गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलवले होते. त्यांनी पाटोदा येथील बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पाटोद्यात खळबळ उडाली आहे. पाटोदा शहरात या घटनेची जोरदार चर्चा होत आहे. जर पोलीसच अशा घटना करायला लागले तर सर्वसामान्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा सवाल केला जात आहे. रक्षकच भक्षक झाल्याचे चर्चा सध्या पाटोद्यात सुरू आहे. या घडलेल्या घटनेमुळे पाटोद्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
याबद्दल पाटोदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील एक महिला काही प्रकरणासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करीत होती. त्यामुळे पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती. यानिमित्ताने मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली. यातून त्यांच्यात संभाषण व मॅसेज झाले. ही संधी साधत त्या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले. ती महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँकच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार केला.
पोलीस अधिकारी ताब्यात
यावेळी त्या महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार करण्यात आला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात आली. दुपारी १ वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यातच बसून होती. या घटनेची गांभीर्य पाहून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट दिली. त्यांनी याबद्दल तपास करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर संध्याकाळी ६.३० सुमारास त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठविण्यात आले.
तसेच अमलदार उद्धव गडकर या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा क्र 77/25 भा.द.वी 64/2 -A(1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाटोदा पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला ताब्यात घेतलं आहे.
नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल रोष
सामान्य नागरिकांचं संरक्षण करण्याची ज्याच्यावर जबाबदारी असते तो पोलीस खात्यातील कर्मचारीच भक्षक बनल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बीडमध्ये मागील काही दिवसांपासून पोलिसांचा वचक कमी होत चालल्याचे दिसत आहे. काही प्रकरणांत पोलिसांचीच गुन्हेगारांसोबत उठ-बस असते, त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रतिमा मलीन होत चालली आहे. त्याच आता हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल रोष आणि गुन्हेगारांबद्दल भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तर बिघडलीच आहे, परंतु सामान्य नागरिकांसह महिला, मुलींची सुरक्षाही धोक्यात असल्याचे दिसते. अगदी किरकोळ कारणावरूनही एकमेकांच्या जीवावर उठून कुऱ्हाड, कुकरी, तलवार, दगडाने ठेचून खून करत आहेत. डिसेंबर अखेरीस मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली, त्याने तर बीडच नव्हे तर महाराष्ट्र हादरला आहे. आता याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या हत्यानंतर पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.