नागपूर :- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, महाल परिसर तसेच चित्रा टॉकीज भागामध्ये हा राडा झाला. कोणत्याही आंदोलनात सहभागी नसलेल्या सामान्य नागरिकांना याचा त्रास झाला असून दगडफेक करण्यात आली तसेच गाड्या जाळण्यात आल्यात. औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यामध्ये वादाच्या ठिणग्या पडताना पाहायला मिळत आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यावरुनच नागपूर शहरामध्ये वादाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळाले असून दोन गटात दगडफेक, जाळपोळीची घटना घडली. यामुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून परिसरात छावणीचे स्वरुप आले आहे.
नेमक काय घडलं?
सोमवारी सकाळी नागपूर शहरामध्ये विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केले होते, त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ज्यामुळे किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास शहरातील शिवाजी चौक तसेच महाल परिसरात मोठा राडा झाल्याची घटना घडली. सायंकाळच्या सुमारास बाहेरुन आलेल्या जमावाने दगडफेक केली तसेच गाड्यांची जाळपोळ केली, ज्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, महाल परिसर तसेच चित्रा टॉकीज भागामध्ये हा राडा झाला. कोणत्याही आंदोलनात सहभागी नसलेल्या सामान्य नागरिकांना याचा त्रास झाला असून दगडफेक करण्यात आली तसेच गाड्या जाळण्यात आल्यात.
दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजी नंतर दोन्ही गट आक्रमक झाले. त्यानंतर दगडफेक करण्यात आली. स्थानिक राजकीय नेत्यांकडून 100 गाड्या जाळल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात आला. पोलिसांनी मर्यादित बळाचा वापर करून जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.दगडफेकीत अग्नीशमन दलाचे जवान देखील जखमी झाल्याची माहिती आहे.
पोलीस दगडफेकीत जखमी
नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र त्यानंतरही तणाव कमी झाला नाही. दंगलखोरांनी पोलिसांनाही लक्ष्य केले. त्यात अनेक पोलीस जखमी झाले आहे. दोन्ही गटातील शेकडो लोक रस्त्यावर आहेत. पोलिसांवर तुफान दगडफेक केली जात आहे. दोन जेसीबी जाळण्यात आले आहे. अनेक वाहने जाळली आहेत.
नाईलाजाने अतिरिक्त बळाचा वापर
नागपूर हे अमनचे शहर आहे. त्यामुळे याला कुठेही गालबोट लागता कामा नये, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे अतिरिक्त बळाचा वापर करण्याची आमची इच्छा नाही. परंतु, नाईलाजाने आम्हाला तो करावा लागतोय, अशी प्रतिक्रिया पोलिस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दगडफेकीमुळे गाड्यांचेही नुकसान
मात्र चिटणीस पार्कच्या पलीकडे भालदारपुरा परिसरातून मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या आकाराचे दगड पोलिसांच्या दिशेने भिरकावले जात असल्यामुळे पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या वापरून जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीमध्ये काही गाड्यांचे नुकसानही झाल्याची माहिती आहे.
क्रेनला आग, गदडफेक
मिळालेल्या माहितीनुसार जमावाने एका क्रेनलाही आग लावली आहे. पोलिसांच्या दिशेने दगड आणि विटा भिरकावल्या जात आहेत. मात्र पोलीस जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरकरांना शांततेचे आवाहन
या घटनेनंतर मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.