एरंडोल :- संभाजीनगर येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद,बजरंग दल यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने प्रांताधिका-यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांच्या जयघोषाच्या दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
विश्व हिंदू परिषद,बजरंग दल यासह विविध संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,क्रूरकर्मा औरंगजेब याचा मृत्यू अहिल्यादेवीनगर येथे झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाचा संभाजीनगर येथे दफनविधी करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी कबरीचे बांधकाम करण्यात आले.क्रूर औरंगजेब याने गुरु गोविंदसिंह यांचेसह त्यांच्या मुलांची अत्यंत निर्दयपणे हत्या केली.छत्रपती संभाजी महाराज यांना मोठ्या नरकयातना देवून त्यांचीही हत्या केली.तसेच मंदिरांवर हल्ले करून ते पाडले.हजारो हिंदूंची कत्तल करून त्यांच्या प्रेतांची विटंबना केली आहे.औरंगजेबाची कबर देशाला कलंक असून तो कायमस्वरूपी पुसण्याची गरज आहे.शासनाने याबाबत त्वरित दखल घेवून कबर तोडावी अन्यथा विश्व हिंदू परिषद,बजरंग दलाचे कार्यकर्ते कारसेवा करून
कबर नष्ट करतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिका-यांनी विविध प्रकारच्या घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता.यावेळी शेकडो पदाधिका-यांच्या स्वाक्ष-या असलेले निवेदन प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना देण्यात आले.यावेळी पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते,भरत महाजन,संजय पाटील,अजय पाटील, विकी ठाकूर यांचेसह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदनावर सुमारे पाचशे पदाधिका-यांच्या स्वाक्ष-या असून यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणार आहे.