भोपाळ :- मध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिच्या नाजूक ठिकाणी चाकूने वार करत तिची हत्या केली होती. या प्रकरणातील नराधमाला न्यायालयाने तीनवेळा फाशीची शिक्षा सुनावली आहे. पुरावे नष्ट करण्यास आई आणि बहिणीने नराधमाला मदत केली होती.त्यांनाही दोन-दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.नवा बीएनएस कायद्यानुसार शिक्षा ठोठावण्यात आलेले हे पहिलेच प्रकरण आहे, ज्यामध्ये दोषीला तीन वेगवेगळ्या कलमांखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. अतुल निहाले, असे नराधमाचे नाव आहे. 24 डिसेंबर 2024 मध्ये ही घटना घडली आहे.
भोपाळमधील शाहजहांबादमध्ये 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगासह शरीरावर चाकूचे वार केले होते. त्यानंतर तिचा मृतदेह लपविण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी अतुलच्या आई आणि बहिणीने मदत केली होती. या घटनेचा निकाल सहा महिन्यांच्या आत लागला आहे. विशेष न्यायाधीश कुमुदिनी पटेल यांनी हा निकाल दिला आहे.चिमुरडीची हत्या केल्यावर तिचे पाय बांधण्यात आले, तिचा मृतदेह पोत्यात भरून बाथरूमच्या वर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या टाकीत लपवण्यात आला. बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यावर पोलिसांनी चिमुरडीला शोधून काढले. आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी होती, असा दावा करण्यात आला.
पण, ‘गुन्ह्याच्या वेळी आरोपी पूर्णपणे निरोगी होता. त्याने हा गुन्हा नियोजबद्ध पद्धतीने केला होता,’ हे सरकारी वकिलांनी सिद्ध करून दाखवले. न्यायालयाने म्हटले, ‘हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांच्या श्रेणीत येते. जर आपण मुलांना, असा समाज देऊ शकत नाहीत, जिथे स्वत:च्या अंगणात, घरात, शाळेत खेळू शकतील, तर सुसंस्कृत समाजाची कल्पना कशी करता येईल? मृत्यूदंडापेक्षा मोठी शिक्षा असेल, तर ती आरोपीला मिळायलाच हवी. आरोपी अत्यंत क्रूर, निर्दयी, भयानक, पाशवी आहे.”






