धरणगाव ;- चारित्र्यावर संशय घेत पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची संतापजनक घटना २६ मार्चच्या मध्यरात्री धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे घडली.खून केल्यानंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. सोमनाथ सोनवणे या व्यक्तीनं चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नी शितल सोनवणे हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा निर्घृण खून केला आहे. या घटनेत दहा वर्षांचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावलाय, मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
सोमनाथ सोनवणे हा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीवर संशय घेत होता. नातेवाईकांनी समजावल्यानंतरही त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जात नव्हते. रात्री त्याने मोठ्या प्रमाणात दारू सेवन केली आणि मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास शितल झोपेत असताना तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात शितल गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु शेवटी मृत्यू सोबत तिची झुंज अपयशी ठरली. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आरोपीला अटक करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरी पुढील तपास सुरू आहे. ही घटना समाजाला हादरवणारी आहे. अविश्वास, संशय आणि दारूच्या आहारी जाऊन एका कुटुंबाचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला आहे. आता या प्रकरणात आरोपीवर कायदेशीर कारवाई होईल, त्याला शिक्षा देखील होईल. परंतु या संपूर्ण प्रकरणात सोमनाथ आणि शितलच्या दोन निष्पाप मुले आता मात्र, आई आणि वडिलांच्या प्रेमाला मुकणार आहेत. संशयाच्या भुताने एका सुखी संसाराची राख रांगोळी केल्याचे यानिमित्ताने दिसून आलं आहे.