राज्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळीची शक्यता, सकाळपासून ढगाळ वातावरण

Spread the love

जळगाव : दक्षिण तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत गोलाकार वाऱ्यांची स्थिती कायम असून तेलंगणपासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आज सकाळपासून जळगाव जिल्ह्यात अवकाळीचे ढग दाटून आले आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने जळगावकरांना उन्हाच्या कडाक्यातून काहीसा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, काल बुधवारी जळगाव जिल्ह्यातील तापमान ४३ ते ४४ अंशावर होते. काल भुसावळचे कमाल तापमान ४४.२ तर जळगावचे ४३.५ अंश नोंदवण्यात आले आहे.

आजपासून राज्यात २१ ते २४ पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, या काळामध्ये वाढलेल्या तापमानाच्या प्रभावाखाली राज्यात मेघगर्जनेसह पावसाची उपस्थिती असते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

टीम झुंजार