अकोला :- जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव या गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभर मेहनत करून जमवलेली संपत्ती काही क्षणांत चोरट्यांनी लंपास केली, आणि ही बातमी कानावर येताच 65 वर्षीय घरमालक अशोक नामदेवराव बोळे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अशोक नामदेवराव बोळे असं मृत व्यक्तीचे नाव असून, ते हातगाव येथील रहिवासी होते. गुरुवारी रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून या संदर्भात अकोला स्थानिक पोलिसांचा आणि गुन्हे शाखेचा संयुक्त पंचनामा सुरु आहे.
आता या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे.नक्की झालं काय?अशोक बोळे यांच्या घरात रात्री अज्ञात चोरट्यांनी शिरकाव करत सुमारे 4 ते 5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेचा समावेश होता. चोरी झाली तेव्हा घरात कोणीच नसल्याने चोरट्यांनी संधी साधत ही लूट केली. काही वेळाने बोळे कुटुंबीयांनी घरी चोरी झाल्याची माहिती मिळताच, अशोक बोळे यांनी तात्काळ घराकडे धाव घेतली. मात्र, घराजवळ पोहोचण्याआधीच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. गावकऱ्यांनी लगेचच त्यांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. चोरीचा धक्का इतका तीव्र होता की अशोक बोळेंचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखा आणि मूर्तिजापूर पोलिसांनी संयुक्तपणे पंचनामा करत तपास सुरू केला आहे.चोरट्यांचा मागमूस लागेनासध्या चोरट्यांचा काही ठावठिकाणा लागलेला नसून, पोलिसांसमोर हे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, शेजारील लोकांची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, लवकरच आरोपींचा छडा लागेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना केवळ चोरीपुरती मर्यादित राहिलेली नसून, एका कुटुंबासाठी ती आयुष्यभराची जखम घेऊन आली आहे. स्थानिक नागरिकांनीही या घटनेनंतर चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे.