एरंडोल :- एका वर्षांपूर्वी विवाह झाला,विवाहानंतर १ मे रोजी पुत्ररत्न झाल्यामुळे मुलाच्या बारशासाठी सुट्टीवर आलेल्या केंद्रीय आद्योगिक सुरक्षा बलाचा जवान युद्धजन्य परिस्थितीमुळे मुलाचे बारसे सोडून काश्मिरला देशाच्या संरक्षणासाठी रवाना झाला. देशावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पारिवारिक कार्यक्रमाऐवजी देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी महत्वाची
असून मला संधी मिळाल्याचे जवान लक्ष्मण चौधरी यांनी सांगितले.येथील माजी उपनगराध्यक्ष तथा भाजप ओ.बी.सी.मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष,प्रसिद्ध व्यावसायिक अशोक सुकदेव चौधरी यांचे पुत्र लक्ष्मण चौधरी यांनी परिवाराची आर्थिक परिस्थिती सक्षम असतांना देखील मनात देशसेवा करण्याची इच्छा असल्यामुळे सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला.
वडील अशोक चौधरी व आई प्रभावती चौधरी यांनी मुलास परिवाराचा आर्थिक व्याप मोठ्या प्रमाणावर असून तु शेतीसह व्यवसाय सांभाळ असे सांगितले मात्र सैन्यदलात जाऊन देशसेवा करायची अशी जिद्द असलेल्या लक्ष्मणने मला सैन्यदलातील नौकरी करावयाची असल्याचे सांगितले.लक्ष्मण चौधरी यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात निवड होऊन ते झारखंड राज्यातील धनबाद येथे कर्तव्यावर रुजू झाले.फेब्रुवारी २४ मध्ये लक्ष्मण चौधरी यांचा दिपाली यांचेशी विवाह झाला.विवाहानंतर १ मे महाराष्ट्रदिनी लक्ष्मण चौधरी यांच्या पत्नी दिपाली यांनी गोंडस पुत्रास जन्म दिला.पुत्ररत्न झाल्यामुळे चौधरी परिवारात उत्साहाचे वातावरण होते.
लक्ष्मण चौधरी यांना पुत्र झाल्याचे कळवण्यात आल्यानंतर ते विस दिवसांची रजा घेवून एरंडोल येथे पाच मे रोजी आले.वडील लक्ष्मण चौधरी, आजोबा अशोक चौधरी यांचेसह परिवारातील सदस्यांनी मुलाचे बारसे करण्याचे नियोजन करून १२ मे हि तारीख निच्छित करण्यात आली.बारशाचा कार्यक्रम असल्यामुळे लक्ष्मण चौधरी यांच्या बहिणी व नातेवाईक त्यांच्याकडे आले होते.बारशाचा कार्यक्रम असल्यामुळे परिवारातील सर्व सदस्य कार्यक्रमाचे नियोजन करत असतांनाच भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणाव निर्माण होऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली.लक्ष्मण चौधरी यांना धनबाद येथील कार्यालयातून तुमची सुट्टी रद्द करण्यात आली असून तातडीने कर्तव्यावर हजर राहण्याचे कळवण्यात आले.
लक्ष्मण चौधरी यांनी देखील क्षणाचाची विलंब न लावता कौटुंबिक कार्यक्रमाऐवजी देशसेवेला प्राधान्य देवून कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला.मुलाचे बारसे १२ मे रोजी असतांना लक्ष्मण चौधरी हे एक दिवस अगोदर ११ मे रोजी सकाळी धनबाद येथे रवाना होत असून त्यानंतर त्यांना श्रीनगर येथे पाठवण्यात येणार आहे.लक्ष्मण चौधरी यांच्या पत्नी दिपाली चौधरी यांचेसह वडील अशोक चौधरी, आई प्रभावती चौधरी,आजी श्रीमती गंगुबाई चौधरी व परिवारातील सदस्यांनी देखील तुम्हाला देशाच्या संरक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली असून तुम्ही बारशाऐवजी देशसेवा करण्यासाठी जा असे सांगून त्यांना प्रेरणा दिली.
परिवाराची आर्थिक परिस्थिती चांगली असतांना केवळ देशसेवेची आवड असल्यामुळे लक्ष्मण चौधरी यांनी सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला.लक्ष्मण चौधरी यांचे वडील माजी उपनगराध्यक्ष असून त्यांचा किराणा मालाचा मोठा व्यवसाय असून त्यांचेकडे अनेक कामगार कामाला आहेत.त्यांचेमोठे भाऊ डॉ.मुकेश चौधरी हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ असून ते ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे आजोबा कै.सुखदेव चौधरी यांची प्रसिद्ध शेंगदाणा तेलाचे उत्पादक व प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळख होती.