मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा तेहतीसावा सामना मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. शेवटच्या षटकापर्यंत दोलायमान असलेला सामना शेवटी चेन्नईने जिंकला. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मुंबई इंडिअन्सकडून कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन उतरले. मुकेश चौधरीने दोघांनाही पहिल्याच षटकात शून्यावर बाद केले.
मुंबईकडून सर्वाधिक धावा तिलक वर्माने काढल्या. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ४३ चेंडूंत बिनबाद ५१ धावा काढल्या. सूर्यकुमार यादवला मिशेल सॅनटेनरने बाद केले. त्याने ३ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने २१ चेंडूंत ३२ धावा काढल्या. ऋतिक शौकीनला ड्वेन ब्राव्होने बाद केले. त्याने ३ चौकारांच्या सहाय्याने २५ चेंडूंत २५ धावा काढल्या. जयदेव उनाडकटने १ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ९ चेंडूंत बिनबाद १९ धावा काढल्या. किरॉन पोलार्डने १४ धावा काढल्या. त्याला महेश ठिकशानाने बाद केले. मुंबईला १५५ धावांपर्यंतची मजल गाठून देण्यात तिलक वर्मा आणि जयदेव उनाडकटचं मोठं योगदान होतं. मुकेश चौधरीने ३-०-१९-३, ड्वेन ब्राव्होने ४-०-३६-२, मिशेल सॅनटेनरने ३-०-१६-१, महेश ठिकशानाने ४-०-३५-१ यांनी गडी बाद केले. आजच्या सामन्यातही रवींद्र जडेजाने मुकेश चौधरीला ४थं षटक टाकू दिलं नाही. एका गुणी गोलंदाजावर सातत्याने अन्याय करून जडेजा काय साध्य करत आहे? मुंबईचे गोलंदाज आज चेन्नईला रोखू शकले तर त्यांना पहिला विजय मिळवता येऊ शकतो.
चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक धावा अंबाती रायडूने काढल्या. त्याला डॅनियल सॅम्सने बाद केले. त्याने २ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ३५ चेंडूंत ४० धावा काढल्या. रॉबिन उत्तपाला जयदेव उनाडकटने बाद केले. त्याने २ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने २५ चेंडूंत ३० धावा काढल्या. १६व्या षटका अखेर चेन्नईचा संघ १०८/६ अशा परिस्थितीत होता. चेन्नईला विजयासाठी ६ चेंडूंत १७ धावांची गरज होती. ड्वेन प्रिटोरियसला जयदेव उनाडकटने २२ धावांवर पायचीत पकडले. पण महेंद्रसिंग धोनीने आपला अनुभव पणाला लावून शेवटच्या षटकात १ षटकार आणि दोन चौकार मारून चेन्नई संघाला विजय प्राप्त करून दिला. महेंद्रसिंग धोनीने बिनबाद २८ धावा काढल्या. शेवटच्या षटकापर्यंत दोलायमान असलेला सामना शेवटी चेन्नईने जिंकला. डॅनियल सॅम्सने ४-०-३०-४, जयदेव उनाडकटने ४-०-४८-२, रिले मेरेडिथने ४-०-२५-१ गडी बाद केले.
भारतीय संघाच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटचं कर्णधारपद भूषवणार्या रोहित शर्माकडून योग्य ती कामगिरी होत नाही. तो स्वतः मानसिक स्तरावर पराभूत असल्यामुळे संघाचं मनोधैर्य वाढवू शकत नाही. किरॉन पोलार्डही आतापर्यंत विशेष योगदान देऊ शकला नाही. खरंच दोघांनाही सक्तीची विश्रांती दिली पाहिजे. नाहीतर मुंबई इंडिअन्स ह्या मोसमात एकही सामना जिंकू शकणार नाही.
मुकेश चौधरीला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने १९ धावांमध्ये ३ गडी बाद केले होते.
उद्या दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतक्त्यात आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करतील.