भडगाव | प्रतिनिधी :- भडगाव तालुक्यातील वाक गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करत असताना ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना १७ मेच्या मध्यरात्री घडली.
मृत चालकाचे नाव रामदास सुभाष सोनवणे (वय ३५, रा. पेठ, भडगाव) असे असून, ट्रॅक्टरचे टायर अचानक फुटल्याने त्याने उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅक्टर त्याच्या अंगावर पलटी झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.
गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करत असताना शनिवारी पहाटे वाक गावाजवळील वडाच्या झाडाजवळ ट्रॅक्टर चालवत असताना ट्रॅक्टरचे मोठे टायर अचानक फुटले. दरम्यान चालक रामदास सुभाष सोनवणे (वय ३५, रा. पेठ भडगाव) याने ट्रॅक्टर वरून खाली उडी मारली. परंतु ट्रॅक्टर त्याच्या अंगावर पलटी झाले. घटना घडताच रामदास सोनवणे याला भडगाव ग्रामीण रुग्णालयाला दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय मुंडे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. भडगाव पोलीस स्टेशनला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहे.
गिरणा नदीपात्रातून सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर प्रशासनाकडून ठोस कारवाई होणे आवश्यक असल्याचे या घटनेवरून पुन्हा अधोरेखित झाले आहे.