धुळ्यात जुन्या वादातून भरदिवसा गोळीबार करून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न, दोन संशयितांना अटक

Spread the love

धुळे :- जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे असा एकूण ३४ हजारांचा मुद्देमालही जप्त केला.१३ मेस रात्री शाहरुख बाबु शाह (वय २५, रा. मोगलाई, साक्रीरोड धुळे) हा आपल्या मित्रासोबत चाळीसगाव रोडवरील अमन कॅफे येथे चहा पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून बिलाल सुबराती शाह (रा. काझी प्लॉट, धुळे) याने त्याच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार केला. यावेळी बिलालचा मित्र हाशिम मलक अब्दुल रहेमान (रा. मिल्लत नगर, धुळे) याने फिर्यादीवर हल्ला करून मारहाण केली. या दोघांनी मिळून शाहरुख यास गंभीर जखमी करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित फरारी होते. दरम्यान, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. उपासे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या नेतृत्वाखाली शोधपथकाने दोघा आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून ३० हजाराचा गावठी कट्टा व चार हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस निरीक्षक घुसर, अविनाश वाघ, शोएब बेग, अतिक शेख, सचिन पाटील, विनोद पाठक, देवेंद्र तायडे, सिराज खाटीक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मुख्य संपादक संजय चौधरी