सासूने घेतला चोरीचा आरोप कंटाळून महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात मारली उडी वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला.

Spread the love

गाझियाबाद :- आत्महत्या करत असलेल्या महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना गाझियाबाद वाहतूक पोलीस दलातील हवालदार अंकित तोमर यांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. तोमर यांच्या प्रयत्नामुळे आत्महत्या करत असलेल्या महिलेचे प्राण वाचले, मात्र त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला.या घटनेनंतर गाझियाबादसह संपूर्ण उत्तर प्रदेश पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. वैशाली येथे असलेल्या हिंदन कालव्यातील पुलावरून एका महिलेने कालव्यात उडी घेतली. २८ वर्षीय अंकित तोमर हे काही अंतरावर होते. अवघ्या २८ सेकंदात त्यांनी पुलाजवळ पोहचून कालव्यात उडी घेतली आणि आत्महत्या करणाऱ्या महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केल. मात्र तोमर यांना पोहता येत नसल्यामुळे ते दुर्दैवाने पाण्यात बुडाले.

तोमर यांच्या मृत्यूनंतर ट्रान्स-हिंदनचे पोलीस उपायुक्त निमिष पाटील यांनी म्हटले की, पोलीस दल शासकीय इतमामात अंकित तोमर यांच्यावर अंत्यसंस्कार करेल. निमिष पाटील पुढे म्हणाले, शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात उडी घेतली होती. त्यापाठोपाठ तोमर यांनीही उडी मारली. इतरांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बचाव कार्य सुरू केले. तोमर यांना शोधण्यासाठी तब्बल दोन लागले. कोसंबी पोलीस ठाण्याचे अधिकारी अजय कुमार शर्मा यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, तोमर यांना कालव्यातून बाहेर काढले तेव्हा आम्हाला वाटले की, तो श्वास घेत आहे. आम्ही त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तोमर २०१६ साली पोलीस दलात दाखल झाले होते.

महिलेने सांगितले आत्महत्येचे कारण

दरम्यान महिला मात्र कालव्यातून सुखरूप बाहेर येण्यात यशस्वी झाली. आत्महत्येचे कारण पोलिसांना सांगत असताना तिने म्हटले की, माझ्या सासरच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली. तेव्हापासून माझी सासू माझ्यावर चोरीचा आळ घेत आहे. त्यांच्या आरोपांना कंटाळून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून मी कालव्यात उडी घेतली. दरम्यान हा सर्व प्रकार घडला तेव्हा कृष्ण कुमार नावाचे व्यक्ती त्याच वाटेवरून आपल्या कुटुंबासह जात होते. त्यांनी पाहिले की, तोमर यांनी पायातील बुटांसह कालव्यात उडी मारली. तसेच कालव्यात एक महिला ओरडत असल्याचेही त्यांनी पाहिले. तोमर यांनी महिलेला कालव्यातून बाहेर ढकलले. पण काही वेळातच तोमर स्वतः बुडू लागले. मी तोमर यांना वाचविण्यासाठी आसपास दोरी शोधत होतो. तेवढ्यात आणखी एका पोलिसाने तोमर यांना वाचविण्यासाठी कालव्यात उडी घेतली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मुख्य संपादक संजय चौधरी