कानपूर :-(उत्तरप्रदेश) एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली आहे. महिलेचे तिच्या पुतण्यासोबत संबंध होते. त्यांच्या नात्याला पतीचा अडथळ निर्माण होत असल्याने पत्नीने पुतण्याच्या मदतीने पतीला संपवलं.हे प्रकरण लपवण्यासाठी तिने घराच्या शेजारी राहणाऱ्या दोघांवर हत्येचा आरोप रचला. या हत्येवरून एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांनाही आपल्या ताब्यात घेतलं आहे. या घटनेला काही दिवस झाले आहे. या प्रकरणाला आता एक वेगळ वळण प्राप्त झालं आहे. दरम्यान, मृत व्यक्तीच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. पत्नीने तिच्या पतीला मारहाण करत ठार मारलं. पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीलाच नसून पुतण्यालाही अटक केली आहे. मृताच्या पत्नीचे तिच्याच पुतण्यासोबत नातेसंबंध होते. यामुळे दोघांनी मिळून व्यक्तीची हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये ही हादरवणारी घटना घडली आहे. पुतण्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या काकीने तिच्या नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. नवऱ्याला तिने झोपेच्या गोळ्या खायला दिल्या. त्यानंतर प्रियकर असलेल्या पुतण्याच्या मदतीने नवऱ्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर लाकडानं प्रहार करून हत्या केली. त्यानंतर नवऱ्याची हत्या झाल्याचा बनाव रचला. पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. गावातीलच तीन जणांवर तिने हत्येचा आरोप केला. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांना कोठडीतही पाठवलं. मात्र, फॉरेन्सिक पथक आणि पोलीस तपासात एकेक धागा जुळत गेला आणि पुतण्या आणि काकीच्या कृत्याचा पर्दाफाश झाला.
साढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मणखेडा गावात धीरेंद्र हा शेतीचं काम करायचा. ११ मे रोजी त्याचा मृतदेह घराबाहेर असलेल्या खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. धीरेंद्र हा पत्नी रीना, चार वर्षांचा मुलगा आणि आईसोबत राहत होता. उसनवारीतून नवऱ्याची हत्या झाल्याचा आरोप पत्नी रीनानं केला होता. गावातीलच तीन जणांवर तिने आरोप केले. त्यांच्यातील वादाची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असं सांगून तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
क्रूर बायकोचा कृत्य उघड
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. धीरेंद्रची पत्नी रीना आणि पुतण्या सतीश यांचे प्रेमसंबंध असल्याचं स्पष्ट झालं. दोघांनी कट रचून धीरेंद्रची हत्या केल्याचे पुरावे हाती लागले आहेत. रीनाचे प्रेमसंबंध असल्याचे धीरेंद्रला समजले होते. पण सतीश हा मोठ्या भावाचाच मुलगा असल्याने काही करू शकला नाही. पत्नीवर पाळत ठेवता यावी म्हणून धीरेंद्रने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचीही तयारी केली होती. ते रीनाला समजले. तेव्हा तिने सतीशसोबत मिळून नवऱ्याचा प्रेमातील अडथळा कायमचा दूर केला.
कॉल डिटेल्स आले आणि भांड फुटलं
रीना हिने १० मेच्या रात्री नवऱ्याला झोपेच्या गोळ्या खायला दिल्या होत्या. त्यानंतर मध्यरात्री सतीशला घरी बोलावलं. लाकडाने डोक्यावर प्रहार करून नवऱ्याची हत्या केली. साढ पोलिसांनी मागील रविवारी दोघांना अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, रीनाच्या मोबाइल कॉल डिटेल्समधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. रीना आणि सतीश यांच्यात दिवसातून ६० ते १०० वेळा कॉल झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
सतीशने खरेदी केले होते दोन सीमकार्ड
पोलीस चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत. सतीशने दोन सिमकार्ड खरेदी केले होते. त्यातील एक सिमकार्ड त्याने रीना आणि दुसरा सिमकार्ड त्याने स्वतःकडेच ठेवला होता. घटना घडली त्या रात्री दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी धीरेंद्रने गहू विकून २० हजार रुपये जमवले होते. पण त्याआधीच सतीश आणि रीनाने कट आखून धीरेंद्रला संपवले. रीनाने भाजीत झोपेच्या गोळ्या टाकून ती खाऊ घातली. त्यानंतर खूप उकडतं म्हणून तिने घराच्या मागे खाट टाकली. तिथेच ती धीरेंद्रसोबत गप्पा मारत होती. धीरेंद्रला झोप लागली. सासू आणि मुलाला खोलीत झोपायला सांगितलं. त्यानंतर रीनाने सतीशला घरी बोलावलं.त्याने लाकडाचे प्रहार करून धीरेंद्रची हत्या केली. हत्येनंतर सगळीकडे रक्त पसरलं होतं. त्या दोघांनी अंगण आणि खोली स्वच्छ केली. हत्येनंतर सतीश त्याच्या घराबाहेर बागेत जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी धीरेंद्रचा मृतदेह बघून रीना जोरजोरात ओरडू लागली. तसेच रडण्याचं नाटक करू लागली. धक्कादायक म्हणजे दोघांनी महिनाभरापूर्वीच धीरेंद्रच्या हत्येचा कट रचला होता. गावातीलच एका तरूणाचा धीरेंद्रसोबत वाद झाला होता. त्याचाच फायदा उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धीरेंद्रच्या हत्येचा आरोप तिने गावातीलच तिघांवर केला.






