मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा चौतीसावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर आणि देवदत्त पडीक्कलने ७ व्या षटकात ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. आज वानखेडेवर जोस बटलर नावाचं वादळ आलं होतं. त्याने प्रत्येकी ९ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने केवळ ६५ चेंडूंत ११६ धावा काढल्या. त्याला मुस्तफिझुर रहमानने १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले.
देवदत्त पडीक्कलला खलिद अहमदने पायचीत पकडले. त्याने ७ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने केवळ ३५ चेंडूंत ५४ धावा काढल्या. कर्णधार संजू सॅमसनने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. त्याने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने केवळ १९ चेंडूंत बिनबाद ४६ धावा काढल्या. राजस्थान रॉयल्सने ह्या मोसमातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. त्यांनी २२२/२ असा भलामोठा धावांचा डोंगर दिल्ली कॅपिटल्स समोर उभा केला.
दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार ऋषभ पंतने ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने केवळ २४ चेंडूंत ४४ धावा काढल्या. त्याला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. ललित यादवला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने केवळ २४ चेंडूंत ३७ धावा काढल्या.
पृथ्वी शॉने देखील ३७ धावा काढल्या. त्याला रवीचंद्रन आश्विनने बाद केले. रोवमन पॉवेलला ओबेड मॅकॉयने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. त्याने ५ षटकारांच्या सहाय्याने केवळ १५ चेंडूंत ३६ धावा काढल्या. डेव्हिड वॉर्नरने २८ धावा काढल्या. त्याला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. २०व्या षटकात दिल्लीला विजयासाठी ३६ धावांची गरज होती. ओबेड मॅकॉयच्या पहिल्या ३ चेंडूंवर रोवमन पॉवेलने ३ सनसनीत षटकार मारले. आणि सामन्यात रंग भरले. पण पुढचा चेंडू निर्धाव झाला. आणि सामना राजस्थान रॉयल्सच्याव दिशेने झुकला. पाचव्या चेंडूंवर केवळ दोन धावा निघाल्या. आणि सहाव्या चेंडूवर रोवमन पॉवेलला ओबेड मॅकॉयने बाद केले. दिल्लीचा संघ २०७/८ असं चांगला प्रतिकार करू शकले. प्रसिद्ध कृष्णाने ४-१-२२-३, रवीचंद्रन आश्विनने ४-०-३२-२, यझुवेंद्र चहलने ४-०-२८-१, ओबेड मॅकॉयने ३-०-५२-१ यांनी गडी बाद केले.
जोस बटलरला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ६५ चेंडूंत ११६ धावा काढल्या होत्या.
उद्या कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. गुजरात टायटन्स विजयासह गुणतक्त्यात आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करतील.