महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..

Spread the love

कोल्हापूर : आंबोलीला फिरायला जाऊन आलेल्या एका नवविवाहित जोडप्याचा त्यांच्या बाथरूममधील गॅस गिझरमधून झालेल्या वायू गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज सकाळी आजरा शहरात उघडकीस आली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सागर सुरेश करमळकर (वय ३२) आणि सुषमा सागर करमळकर (वय २६) अशी मृत पती-पत्नीची नावे असून, अवघ्या महिन्याभरापूर्वीच ते विवाहबंधनात अडकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, करमळकर दाम्पत्य गेल्या रविवारी आंबोली येथे फिरायला गेले होते. आज सकाळी त्यांचे मित्र त्यांना फोन करत होते, पण त्यांनी फोन उचलला नाही.

काही वेळाने फोन बंद येऊ लागल्याने मित्रांना काळजी वाटली. त्यांनी सागर यांच्या घरी जाऊन पाहिले असता, घराचा दरवाजा आतून बंद होता. मित्रांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, सागर आणि सुषमा हे दोघेही बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बाथरूममधील गॅस गिझरमधून वायू गळती झाली असावी. त्यामुळे बाथरूममध्ये कार्बन मोनॉक्साईड वायू जमा झाला आणि त्यातच श्वास कोंडून या दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेने करमळकर कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच नवीन आयुष्य सुरू केलेल्या या तरुण जोडप्याच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे आजरा शहरासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी