जळगाव :- जळगावात एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडलीय आहे.शहरातील आर. आर. विद्यालयातील विद्यार्थी कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १५, रा. रचना कॉलनी) या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.या प्रकरणात संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडून दिशाभूल केली असून, त्यांच्याविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत बालकाच्या कुटुंबीयांतर्फे करण्यात आली असून, फिर्यादीतही नमूद केले आहे. घडल्या प्रकरणात पोलिसांतर्फे सखोल चौकशी सुरू असून, शाळेचा निष्काळजीपणा आढळल्यास कारवाईचे संकेत पोलिसांतर्फे देण्यात आले आहेत.
जळगाव शहरातील आर.आर. विद्यालयातील विद्यार्थी कल्पेश इंगळे याचा शुक्रवारी (ता. ११) मृत्यू झाला. शाळेतील मुलांनी त्याला मारहाण केल्यानेच माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्याचप्रमाणे, शाळा व्यवस्थापनाविरुद्ध रोष व्यक्त करीत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्रीच कल्पेशच्या वर्गशिक्षिका, सोबतचे शिक्षकांना बोलावून घेत चौकशी करण्यात आली असून, वर्गशिक्षिकेचे जबाब नोंदवण्यात आले.चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी सांगितले.