धरणगाव :- तालुक्यातील भवरखेडे येथे घातक रसायनांपासून कृत्रिम दूध तयार करून विक्री करणाऱ्या तरुणाला अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे.सोमनाथ आनंदा माळी (वय 31) असं अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून, सुमारे ८० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले आहे.
भवरखेडा येथे सोमनाथ माळी हा तरूण आरोग्यास अपायकारक असलेल्या रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दुध तयार करून ग्राहकांना राजरोसपणे विकत होता. त्याबाबतची माहिती जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी धरणगाव पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने भवरखेडा येथे छापा टाकला.
छाप्यात माळीच्या घरी भेसळीच्या दुधासाठी वापरली जाणारी रसायने आणि उपकरणे आढळून आली. प्राथमिक चौकशीत माळीने भेसळयुक्त दूध तयार करून विक्री करत असल्याची कबुली दिली आहे. सुमारे ८० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी पोषक मानले जाते. आणि त्याचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण पिण्यासाठी करतात. मात्र, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने काही दिवसांपूर्वी दूध भेसळ तपासणी मोहीम देखील राबविली होती. त्या माध्यमातून विविध ठिकाणच्या खासगी डेअरींमधीन दुधाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले होते. या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतरही दूध भेसळीचे प्रकार थांबलेले दिसत नाही.