झुंजार । प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंदनगर : (ता. इंदापूर) कळंब येथील ग्रामदैवत श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जंगी निकाली कुस्त्यांच्या मैदानाचा सोहळा इंदापूर तालुक्याचे युवा नेतृत्व श्रीराजभैय्या भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कळंब पंचक्रोशीतील हजारो कुस्तीशौकीन व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाला.यावेळी यात्रा कमिटीतील सदस्य श्री ज्ञानेश्वर मेटकरी, राजेंद्र डोंबाळे पाटील, श्री योगेश डोंबाळे पाटील, श्री प्रमोद खंडागळे, श्री सागर कोळी, इक्बाल शेख यांनी उपस्थित श्रीराजभैय्या भरणे यांचा कळंब ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच कळंब गावच्या विद्यमान सरपंच सौ विद्याताई अतुल सावंत यांनी प्रथम क्रमांकाची ठेवलेली कळंब केसरी चांदीची गदा श्रीराजभैय्या भरणे यांच्या हाती देऊन मैदानावर प्रदर्शित करण्यात आली.यावेळी २०२१-२२ सातारा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ७९ किलो वजन गटात सुवर्णपदक विजेता पै.कालिचरण सोलनकर व महाराष्ट्र चॅम्पियन पै.अभिजित ननवरे यांच्यातील निकालि कुस्ती श्रीराजभैय्या भरणे व वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लातुरे साहेब यांच्या शुभहस्ते व जेष्ठ नेते श्री बाळासाहेब डोंबाळे पाटील,उद्योजक श्री उत्तमराव फडतरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री दत्तात्रय फडतरे,मा.पंचायत समिती सदस्य श्री सुहास डोंबाळे पाटील,मा.चेअरमन श्री आप्पासाहेब अर्जून,सरपंच श्री अतुल सावंत, उपसरपंच श्री लक्ष्मण पालवे,चेअरमन श्री अभिजित खंडागळे, संचालक श्री नितिन जानकर,कळंब यात्रा कमिटीतील सर्व सदस्य तसेच उपस्थित हजारो कुस्तीशौकीन व कळंब ग्रामस्थांच्या साक्षीने लावण्यात आली.यावेळी पै.कालिचरण सोलनकर व पै.अभिजित ननवरे यांच्यामध्ये तब्बल ३० मिनिटांच्या झालेल्या लढतीत पै.कालिचरण सोलनकर याने पै.अभिजित ननवरे याच्यावर एका गुणांनी मात करून विजय प्राप्त करून रोख ५१ हजार रूपयांचे बक्षिस व सरपंच कळंब केसरीची चांदीची गदेचा मानकरी ठरला.यावेळी पंच म्हणून श्री बाळासाहेब रूपनवर, श्री संतोष चव्हाण, श्री पप्पु पाटील, श्री भाऊसाहेब माने,शब्बीर शेख, श्री सचिन पाटील यांनी काम पाहिले.
यावेळी व्दितीय क्रमांकाची कुस्ती पै.मामा तरंगे व पै.सागर चौगुले यांच्यात होऊन पै.सागर चौगुले यांनी पै.मामा तरंगे याच्यावर चितपटीने विजय मिळवत ४१ हजार रूपयांच्या कुस्तीचा मानकरी ठरला.तृतीय क्रमांकाची कुस्ती पै दिपक पाडुळे व पै.दादा वाघमोडे यांच्यात होऊन पै.दिपक पाडुळे याने पै.दादा वाघमोडे याच्यावर चितपटीने विजय मिळवून ३१ हजार रूपयांच्या बक्षिसाचा मानकरी ठरला.चतुर्थ क्रमांकाची कुस्ती पै.अनिल तरंगे व पै.संतोष गावडे यांच्यात बरोबरीने सोडवण्यात आली.
यावेळी उपस्थित कुस्तीशौकीन,यात्रा कमिटी व कळंब परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने प्रस्ताविक करताना पै.संदिप पाटील यांनी कळंब परिसरातील हनुमान मंदिर परिसर मोठा असून या परिसरामध्ये भविष्यातील चांगल्या प्रकारचे पैलवान घडविण्यासाठी आधुनिक पध्दतीचा कुस्ती आखाडा तालूक्याचे लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या माध्यमातून व्हावा अशी सार्वत्रिक मागणी मैदानावर उपस्थित असलेले युवा नेतृत्व श्रीराजभैय्या भरणे यांच्यासमोर मांडली त्यावर उपस्थितांसमोर बोलताना श्रीराजभैय्या भरणे यांनी पै.संदिप पाटील यांनी कळंब ग्रामस्थ व उपस्थित कुस्तीशौकीनांच्या वतीने मांडलेली मागणी आपल्यातील एक कार्यकर्ता या नात्याने नामदार श्री भरणे मामा यांच्यासमोर तत्परतेने पोहचवून लवकरात लवकर नामदार श्री भरणे मामा यांच्या प्रयत्नांतून कळंब परिसरातील सर्वांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री हनुमान मंदिर परिसरात भव्य व आधुनिक कुस्तीचा आखाडा तसेच परिसरातील सुशोभीकरणासाठी जेवढा काही निधी लागेल तेवढा निधी तत्परतेने आणण्यासाठी माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता आपल्या सर्वांच्या समवेत प्रमाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे जाहीर करून आपल्या सर्वांची या चांगल्या कामासाठी मी स्वतः आपल्या सर्वांच्या समवेत नामदार श्री भरणे मामा यांची भेट घेऊन सदर काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मागणी करणार असल्याचे जाहीर करून उत्कृष्ट नियोजनाबद्दल यात्रा कमिटीचे जाहिर कौतुक केले.
उपस्थितांनी श्रीराजभैय्या भरणे यांच्या घोषणेचे जाहीर टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.यावेळी प्रथम क्रमांकाचे ५१ हजाराचे बक्षिस श्रीराजभैय्या भरणे यांनी लावल्याबद्दल तसेच सरपंच सौ विद्याताई अतुल सावंत यांनी चांदिची गदा दिल्याबद्दल कळंब यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.व्दितीय क्रमांकाचे ४१ हजाराचे बक्षिस श्री सुहासदादा डोंबाळे पाटील, श्री भारत पाटील, श्री राजेंद्र डोंबाळे पाटील यांचे तसेच तृतीय क्रमांकाचे ३१ हजाराचे, चतुर्थ क्रमांकाचे २१ हजाराचे श्री हनुमंत तात्या राऊत यांनी लावल्याबद्दल कळंब ग्रामस्थांच्या वतीने बक्षिसदात्यांचे आभार मानण्यात आले.