एरंडोल :- शहरात अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांचेसह त्यांच्या चार सहका-यांनी गुटख्याची किरकोळ विक्री करणा-या पान दुकानदारांवर कारवाई केली मात्र गुटख्याच्या घाऊक विक्रेत्यांना पाठीशी घालून त्यांचेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आच्छर्य व्यक्त केले जात आहे.शहरात
पिंपळकोठा,कासोदा,पाळधी,म्हसावद येथील घाऊक विक्रेते शहरातील ठराविक विक्रेत्यांना गुटख्याची विक्री करीत असून पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. शहरातील मेनरोडवर असलेल्या पीर बाखरूम बाबा परिसर,भगवा चौक येथील दोन विक्रेते किराणा मालाच्या दुकानाच्या माध्यमातून गुटख्याची खुलेआमपणे विक्री करीत असून पोलीस प्रशासनाने त्वरित दखल घेवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात पान दुकाने,किराणा दुकाने,चहा दुकान,जनरल स्टोअर्स यासह विविध ठिकाणी गुटख्याची खुलेआमपणे विक्री केली जात आहे.शाळा महाविद्यालय,विविध शासकीय कार्यालय परिसरात गुटखा बिनधास्तपणे विक्री केला जात असल्यामुळे शालेय विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जात आहेत.शहरात पाळधी,कासोदा, पिंपळकोठा, म्हसावद यासारख्या ग्रामीण भागातील गुटख्याचे घाऊक विक्रेते नियोजनबद्ध पद्धतीने गुटख्याची विक्री करीत आहेत.पिंपळकोठा येथील गुटख्याच्या घाऊक विक्रेत्याकडे विविध प्रकारच्या प्रतिबंध असलेल्या तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा दररोज मालवाहू ट्रकच्या माध्यमातून आणला जात असून त्याचा गोडाऊनमध्ये साठा करून नंतर मोटार सायकल व
रिक्षाद्वारे त्याची शहरासह ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेत्यांकडे पोहोच केला जातो.घाऊक विक्रेत्यांकडून गुटख्याची विक्री करतांना विविध प्रकारच्या सांकेतिक भाषेचा वापर केला जातो.माझ्या विरुद्ध कोठेही तक्रार करा,माझेवर कारवाई होणार नाही असे आत्मविश्वासाने पिंपळकोठा येथील विक्रेता सांगत असल्याबद्दल आच्छर्य व्यक्त केले जात आहे.शहरातील भगव्या चौकातील गुटख्याचा एक विक्रेता दुकान बंद ठेवून बाहेर मोकळ्या जागेवर थांबून नेहमीच्या ग्राहकांना तंबाखूजन्य गुटख्याची विक्री करीत आहे.तसेच ठराविक वेळेला शहरात सायकलवर फिरून किरकोळ विक्रेत्यांना घरपोच विक्री करून पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत आहे.शहरात अन्न सुरक्षा अधिका-यांनी गुटखा विक्री करणा-या पान दुकानांवर कारवाई केली त्यादिवशी
पीर बाखरूम बाबा परिसरातील गुटख्याचा घाऊक विक्रेता खुलेआमपणे विक्री करीत असतांना देखील पोलीस प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष करून त्यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.याबाबत पोलीस प्रशासनाने त्वरित दाखल घेवून घाऊक गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.






