सूर्यफूल, सोयाबीन तेल सर्वात महाग; गृहिणींचे बजेट कोलमडले

Spread the love


पिंपरी – सद्यस्थितीत इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह किराणा मालाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये देखील सातत्याने वाढ होत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडल्याने महागाईच्या झळा आता मोठ्या प्रमाणात बसू लागल्या आहेत.

इंधन दरवाढीमुळे बांधकाम क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांमध्ये भाववाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. सर्वसामान्यांना दोन वेळच्या जेवणासाठी कसरत करावी लागत आहे. किराणा मालासह खाद्यतेलांच्या किमती भडकल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्या सर्वच तेलाचे दर 200 रुपये प्रतिलिटरपर्यत पोहचले आहे.

खाद्यतेलांमध्ये सर्वाधिक मागणी असते ती सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाला. मात्र हे तेल बाहेरून येत असल्याने तेथील बाजारभावानुसार या तेलाचे दर ठरत असतात. सध्या सूर्यफूल तेलाचे दर 205 रुपये लिटर आहे. विशेष म्हणजे हे तेल बाहेरून येत असून तेथेही त्याची किंमत वधारली आहे. त्यात आणखी आयातशुल्क आणि देशात आणल्यानंतर भाडेवाढ यामुळे या तेलाचे भाव चांगलेच वधारले आहेत.


सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड शहरामध्ये शेंगदाणा तेल 188 रुपये प्रति लिटर झाले आहे. सोयाबीन 170, सरसो 190, तीळ 270 व पाम तेलाची किंमत 170 रुपयांवर गेली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या महागाईमुळे गृहीणींचे बजेट कोलमडले आहे.

आयात शुल्कात कपात करूनही दरवाढ

केंद्र शासनाने आयात शुल्क कमी केले सांगण्यात येत आहे. मात्र, बाहेरून येणाऱ्या तेलाचा दर तेथील स्थानिक बाजारातच वधारला आहे. अशा परिस्थितीत तेथूनच वाढीव दराने माल पाठविला जात आहे. परिणामी वाढीव दराने तेल येत असून त्यात आयात शुल्क तसेच भाडे जोडल्यानंतर तेलाचे दर आणखी वाढत आहेत. एकंदर आयात शुल्क कमी असले तरीही स्थानिक स्तरावर दर वधारल्याने भारतीय बाजारपेठांमध्ये आयात केलेले तेल येईपर्यंत तेलाचे दर वाढत आहेत.

कंपन्यांनी भाववाढ केल्याने तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामध्ये आयातशुल्क इंधन दरवाढीमुळे झालेली भाडेवाढ याचाही परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा मान्सून चांगला झाला तर तेलाच्या भावामध्ये काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

टीम झुंजार