जळगाव :- ‘माझा तुझ्यावर खूप विश्वास होता, पण विश्वासघात झाला. काय कारण होतं ते कळलंच नाही. माझं काय चुकलं ते सांगायचं होतं. त्याच्यात काय होतं असं… शेवटी निर्णय तुझा आहे. पण मरण्याअगोदर एक सांगतो, आयुष्यात तुझं कधीच चांगलं होणार नाही.
माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये,’ अशी चार पानी चिठ्ठी लिहून विधी शाखेचे शिक्षण घेणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. रोहन झामा पाटील (२४, मूळ रा. वडगाण, ता. रावेर, जि. जळगाव, ह. मु. समर्थनगर, औरंगाबाद) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री ८ वाजता उघडकीस आली.
रोहन हा एम.पी. लॉ काॅलेजमध्ये द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. रविवारी दुपारी मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. सायंकाळी ५ वाजता रूमवर आला. ६ वाजता त्याने रूमचा दरवाजा लावून घेतला. रात्री १० वाजता त्याच्या मित्राने दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. दार तोडल्यानंतर रोहनने गळफास घेतल्याचे दिसले. डॉक्टरांनी मृत घोषित केले.