ट्रक-पिकअपच्या भीषण अपघातात सासू-जावयासह अन्य एक ठार; मृत एरंडोल शहरातिल.

Spread the love

गाडीतील सर्वजण एरंडोल शहरातिल अमळनेर दरवाजा मारोती मंदिर येथील रहिवाशी आहेत.

भोकरदन ( जालना ) : ट्रक आणि पिकअपच्या भीषण अपघातात तिघे मृत्युमुखी पडल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान भोकरदन- जालना रोडवरील बानेगाव पाटीजवळ घडली. मृतांमध्ये सासू-जावयाचा समावेश आहे. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील रामदास रामरतंन पाटील, कल्पनाबाई भरत पाटील, कल्पना गोविंदा ठाकूर, सचिन सुखलाल पाटील आणि भारत पाटील हे पाचजण कुरडई-पापड विक्रीचा व्यवसाय करतात. यासाठीच मंगळवारी सर्वजण पिकअपमध्ये (क्रमांक एम एच -19 सि वाय 1091) जालना येथे निघाले होते. जालना येथे जाण्यासाठी रात्री उशीर झाल्याने भोकरदन तालुक्यातील रिकाम्या जागेत त्यांनी पिकअप गाडी उभी केली. रात्रभर तिथेच मुक्काम केल्यानंतर सर्वजण सकाळी लवकर जालन्याच्या दिशेने निघाले. दरम्यान, सकाळी बाणेगाव पाटीजवळ जालन्याहून येणाऱ्या ट्रकसोबत (क्रमांक एम एच – 40 एके 5156 ) समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. 

यात कल्पनाबाई भरत पाटील ( 47), रामदास रामरतंन पाटील ( 40 ) यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे सासू-जावई असल्याची माहिती आहे. तर जालना येथे उपचारासाठी दाखल केलेल्या तीन जखमींपैकी कल्पना गोविंदा ठाकूर ( 45 ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सचिन सुखलाल पाटील ( 40) आणि भारत पाटील ( 55) यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत. गाडीतील सर्वजण एरंडोल शहरातिल. अमळनेर दरवाजा मारोती मंदिर येथील रहिवाशी आहेत. अपघाताची माहिती मिळताच सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी तात्काळ घटनास्थळी पोलीस कर्मचारी दादाराव बोर्डे, विकास जाधव, दत्ता राऊत, अनिल गवळी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टीम झुंजार