धुळे :- मधील सोनगीर पोलिसांनी शिरपूर कडून धुळेच्या दिशेने भरगाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ कारचा पाठलाग करत ९० तलवारी हस्तगत केल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी कारमधल्या चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
सध्या राज्यभर गढूळ वातावरणाचा भोंगा वाजविला जात असल्याच्या पार्श्वभुमीवर घातपाताचा मोठा डाव सोनगीर पोलिसांनी उधळून लावला. मुंबई आग्रा महामार्गावर एका स्कॉर्पीओचा पाठलाग करून पोलिसांनी गाडीमधील ८ ९ तलवारी आणि एक खंजीर जप्त केला. याप्रकरणी जालना येथील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत…..
एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र घेवून ते नेमके कुठे जात होते , त्यांच्या मागचा कुणीमास्टर माइंड आहे का, घातपाताचा मोठा प्लॅन होता का, या अनुषंगाने पोलिस यंत्रणा तपास करत आहेत. सोनगीर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आज सकाळी गस्तीवर असताना मुंबई – आग्रा महामार्गावर वाघाडी फाट्यानजीक शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने एमएच ० ९ सीएम ००१५ क्रमांकाची काळ्या रंगाची काच असलेली स्कॉर्पीओ सुसाट जाताना दिसली. गस्तीवरील पोलिसांना संशय आल्याने त्यांनी स्कॉपीओचा पाठलाग करून गाडी थांबविण्याचा चालकाला इशारा दिला
मात्र त्यानंतर चालकाने गाडी पळविली . पोलिसांनी पुन्हा पाठलाग करत सोनगीर फाट्याजवळ स्कॉपीओला ओव्हरटेक करुन गाडी थांबविली . गाडीमध्ये चौघे जण होते . त्यांची विचारपुस केली असता त्यांनी उडवा – उडवीची उत्तरे दिली पोलिसांचा संशय आणखी बळावला , स्कॉर्पीओची तपासणी केली असता त्यात ८ ९ तलवारी आणि एक खंजीर आढळून आला . पोलिसांनी गाडीसह ७ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . याप्रकरणात मोहम्मद शरीफ मोहम्मद शकीफ (वय- ३५) , शेख इलीयाज शेख लतीफ ( वय ३२ ) दोघे रा . सिध्दार्थ नगर , वैशाली किराणा जवळ , जालना , सैय्यद नईम , सैय्यद रहीम ( वय-२९ ) रा . सुंदर नगर , एसटी वर्क शॉपच्या मागे जालना , कपील विष्णू दाभाडे ( वय – ३५ ) रा . पंचशील नगर , बुध्द विहार जवळ , जालना या आरोपींना अटक करण्यात आली आहे..
विविध कलमान्वये आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय चंद्रकांत पाटील करीत आहेत . पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील , अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव , डीवायएसपी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चंद्रकांत पाटील , हे.कॉ. शामराव अहिरे , पोना ईश्वर सोनवणे , पो.कॉ.सुरज साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली . याबाबतची माहिती आज दुपारी पोलिस मुख्यालयात एसपी प्रविणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून दिली