राज्यात दंगल घडवण्याचा कट ? ; आमदार राम कदम

Spread the love

धुळे : मागील काही काळामध्ये तलवारींचे पेव फुटलेले दिसत असून अनेक ठिकाणांहून तलवारी जप्त केल्या जात आहेत. मध्यंतरी औरंगाबादमधून कुरिअरने आलेल्या अनेक तलवारी जप्त केल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच आणखी एका ठिकाणी पोलिसांनी तब्बल ८९ तलवारींचा साठा जप्त केला आहे.

पेट्रोलिंग दरम्यान सोनगीर पोलिसांना शिरपूर येथून धुळे शहराच्या दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओमधून सदर तलवारी जप्त केल्या. पोलिसांनी या सर्व तलवारी व चार लोकांना ताब्यात घेतले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी कशासाठी आणण्यात आल्या होत्या हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. परंतु, या कारवाईमुळे संभाव्य अनर्थ मात्र टळला असल्याचे चर्चिले जात आहे.

पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान या स्कॉर्पिओबाबत शंका आली व वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केला. वाहन अडवून चौघांसह वाहनाच्या आतील सामानाची झडती घेतली असता धक्कादायक माहिती पुढे आली. त्या वाहनात तब्बल नव्वद धारदार तलवारी मिळून आल्या आहेत. तलवारींसह चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

राज्यात दंगल घडवण्याचा कट

धुळ्यात ८९ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्या राजस्थानात काँग्रेसचं सरकार आहे त्याच ठिकाणाहून धुळ्यात या तलवारी आल्या आहेत. जालनाला या तलवारी पाठवण्यात येणार होत्या. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी कशाला? कुणाला दंगल घडवायची आहे का? महाराष्ट्रात तलवारी पाठवणारे राजस्थानमधील कोण लोक आहेत? या प्रकरणाच्या खोलवर तपास केला पाहिजे. ठाकरे सरकार ही चौकशी करणार का? असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी दिला आहे.

टीम झुंजार