
राज ठाकरे यांचे भाषण हा फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे तर सर्वसामान्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. अगदी विरोधी पक्षाचे पण राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीलेले असते. एखादा विषय भक्कम पुराव्यासह, बिनतोड युक्तीवादासह मांडणे याबाबत राज ठाकरे हे नेहमीच इतर राजकीय नेत्यांपेक्षा उजवे ठरतात. विशेषतः एखाद्याची नक्कल करुन संबंधित मुद्दा पोहचवण्याचे राज ठाकरे यांचे एक वेगळेच कसब आहे.
असं असलं तरी अनेकदा मोठ्या कार्यक्रमात भाषण करण्यापूर्वी हातपायाला घाम फुटत असल्याची कबुली राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलतांना दिली आहे. “हातपाय थंड पडलेले असतात. मला माहीती नसतं मी काय बोलणार आहे. मी उभं राहिल्यावर माझ्या तोंडातून काय येणार, काय बोलणार आहे, नसतं माहिती. मी बोलीनच याची गॅरंटी नाही. कित्येक वेळा असं झालं की नोट्स काढलेल्या असून सुद्धा लक्ष लागलेलं नसतं. एकदा उभं राहील की बोलायला सुरुवात केली की समोर कोण बसलं आहे हे दिसत सुद्धा नाही. भाषण करतांना एकच विषय नसतो ना, विषयाला असलेले कंगोरे २५-३० असतील, पण बोलतांना काय गोष्टी समोर येतील म्हणून त्याचे सर्वात जास्त टेन्शन असतं ” असं रा ठाकरे म्हणाले.
माझा कट्टाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की ” राज यांचे वाचन खूप आहे. ज्या दिवशी सभा असते त्या दिवशी मी राज यांच्या रुममध्ये कोणालाच पाठवत नाही, भाषण वाचून दाखवत नाही, त्याचे भाषण उत्स्फुर्त असते.”
या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास आणि मनमोकळेपणाने उत्तरे दिली.