पुणे : चितेवर पेट्रोल ओतल्याने भडका उडून दहा ते बारा जण होरपळ्याची घटना राजा बहाद्दुर मिल रस्त्यावरील कैलास स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेत दोन ते तीन जण गंभीर होरपळले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ताडीवाला रस्ता परिसरातील रहिवासी दीपक प्रकाश कांबळे (वय 45) यांनी शनिवारी सकाळी सातच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ससून रूग्णालयातील वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह कैलास स्मशानभूमीत नेण्यात आला. अग्नी दिल्यानंतर प्लास्टिक कॅनमधील पेट्रोल चितेवर ओतण्यात आले. त्याच वेळी स्मशानभूमीतील ब्लोअर यंत्रणा सुरु करण्यात आली.
चितेवर ज्वलनशील पदार्थ ओतण्यात आल्याने भडका उडला. त्या वेळी अंत्यसंस्कारास उपस्थित असलेले दहा ते बारा जण होरपळले, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. या घटनेत होरपळलेले तीन ते चार जण गंभीर आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती दलाकडून देण्यात आली.