मटण देत नाही म्हणून केला वडिलांचा खून

Spread the love

दहिवडी  -कासारवाडी (ता. माण) येथील नटराज पांडुरंग सस्ते या युवकाने मटण खायला का घालत नाही म्हणून वडील पांडुरंग बाबुराव सस्ते यांचा शेतामध्ये पाठलाग करून कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने डोक्‍यात आणि मानेवर वार करून खून केला.

मटण वारंवार का आणत नाही आणि मला का खायला घालत नाही, यावरून नटराज वडलांशी वारंवार हुज्जत घालायचा. आपली परिस्थिती बेताची आहे, असे वडील त्याला नेहमी समजवायचे. मटण महाग असल्यामुळे ते नेहमी आपल्याला आणून खायला परवडत नाही, असे सांगायचे. तरीदेखील तो वडिलांना धमकी द्यायचा कुठूनही पैसे आणा आणि मला खाण्यासाठी मटण घेऊन या नाहीतर मी तुम्हाला जीवे मारीन. याअगोदरही त्याने मटण का आणले नाही या कारणांवरून वडिलांवर जीवघेणा हल्लाही केला होता.

त्यामध्ये मात्र वडील बचावले होते. तरीदेखील वडिलांनी अनेकदा परिस्थिती नसतानाही त्याला अनेकदा मटण खायला घातल्यामुळे त्याला त्याची चांगलीच चटक लागली होती. त्यामुळे त्याला मटण खायला नाही मिळाले की तो वेड्यासारखा करायचा आणि वडिलांच्या अंगावर मारण्यासाठी धावायचा. काल शुक्रवारी दि. 29 रोजी तो वडिलांना मटण आणण्यासाठी आग्रह करत होता. पण वडिलांनी पैसे नसल्याने मटण आणण्याचे टाळले.

त्यामुळे चिडून जाऊन घरामध्ये तो वडिलांच्या अंगावर जाऊन त्यांना जोरदार मारहाण करू लागला. मारहाणीच्या भीतीने वडील सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास शेताच्या दिशेने पळू लागले. परंतु, माथेफिरूने वडिलांचा पाठलाग करत हातामध्ये असलेल्या धारदार कुऱ्हाडीने फिल्मी स्टाइलने वडिलांच्या डोक्‍यामध्ये सपासप पाच ते सहा वार करून खून केला. वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले.
या घटनेची तक्रार त्याची आई चतुराबाई पांडुरंग सस्ते यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक डी. जी. तुपे तपास करत आहेत.

टीम झुंजार