कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या नूतनीकरण केलेल्या स्मारकाचे लोकार्पण

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र, गिरणी कामगारांचे लढे, जनतेच्या प्रश्नांवरील अनेक चळवळी अशा सर्वच आघाड्यांवर अग्रक्रमावर असलेले लोकनेतृत्व कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या चिंचपोकळी नाक्यावरील नूतनीकरण केलेल्या कॉ. गुलाबराव गणाचार्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र आणि कामगार दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.
नगरसेविका सुरेखा लोखंडे यांच्या प्रयत्नातून मुंबई महानगरपालिकेकडून साकार झालेल्या या स्मारकाच्या नूतनीकरण सोहळ्यास भाजप नेते. आमदार आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर, बँकिंग क्षेत्रातील कामगार नेते विश्वास उटगी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रकाश नार्वेकर, महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण व इतर कॉम्रेड, रोहिदास लोखंडे, अनिल गणाचार्य, सुनिल गणाचार्य व कुटुंबिय, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी गुलाबराव गणाचार्य यांचे स्मारक त्यांचे गुरु असलेले साने गुरुजी यांच्या रस्त्याच्या नाक्यावर असणे हा गुरु-शिष्याचा प्रेरणास्त्रोत असल्याचे सांगितले. गुलाबराव गणाचार्य हे खर्‍या अर्थाने लोकनेते होते, तसेच त्यांचे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी असलेले योगदान येणाऱ्या पिढीला अशा स्मारकातून समजेल तसेच प्रेरणा देईल, असे विचार व्यक्त केले. अतुल भातखळकर यांनी गुलाबराव गणाचार्य यांच्याबद्दल समयोचित मनोगत व्यक्त केले.
गुलाबराव उर्फ नाना यांचे सुपुत्र अनिल गणाचार्य यांनी चळवळीचा तो काळ नजरेपुढे आणला, ते वास्तव्य करत असलेली केरमानी बिल्डिंग ही अनके चळवळीची साक्षीदार राहिली, बंदुकीच्या गोळ्यांच्या फैरीच्या खूणा इथल्या स्वराज्य हॉलवर दिसत असत, त्याचबरोबर समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्ती ही नानांच्या संपर्कात असायची, त्यांच्याकडून आम्हाला समाजकार्याची प्रेरणा मिळत गेली. त्यांचे स्मारक हे संघर्ष आणि समाजोपयोगी कार्याची सतत प्रेरणा देत राहिल, असा विश्वास व्यक्त केला.

आभार व्यक्त करताना गुलाबराव गणाचार्य यांचे सुपुत्र सुनिल गणाचार्य यांनी या स्मारकाच्या निर्मितीमागे केवळ व्यक्ति म्हणून नव्हे तर एक विचार म्हणून अनेकजण सहभागी असल्याचा उल्लेख केला. कॉ. गुलाबराव गणाचार्य हे व्यक्ति नव्हे तर विचार म्हणून आजही आपल्यात आहेत, हा विचार आपल्याला सदैव समाजकारणाची प्रेरणा देत राहिल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास लोखंडे यांनी केले तसेच यावेळी मान्यवरांनादेखील सन्मानित करण्यात आले.

टीम झुंजार