सावित्रीबाई फुले यांच्या (३ जानेवारी) जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची आठवण
मुंबई दि. 02: महिलांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या अग्रणी सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी ही जयंती. यानिमित्त त्यांच्या महिला शिक्षणक्षेत्रातील कार्याची ही थोडक्यात आठवण.
स्वातंत्र्यपूर्व शंभर वर्षापूर्वीचा काळ हा सामाजिक रूढी परंपरांचा काळ होता. महिलांचे शिक्षण हे त्या काळी वर्ज्य होते. त्या काळात सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विशेषत: महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य जोतिराव व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाईंनी स्वत: शिक्षण घेऊन महिलांसाठी शिक्षिकेचे काम केले. त्यांच्या या अनन्यसाधारण कार्यामुळेच त्यांना महिला शिक्षणाचे प्रवर्तक मानले जाते.
सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंचा विवाह १८४० मध्ये जोतिरावांसोबत झाला. सावित्रीबाईचे शिक्षण जोतिरावांनीच पुरे केले. जोतिबा फुले यांच्या मदतीने त्यांना सतत पुढे जाण्याकरीता प्रेरणा मिळत होती, ते त्यांचे फक्त पती नव्हते तर एक चांगले गुरू व संरक्षक देखील होते. सावित्रीबाईंच्या कार्याचे ते सतत कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवित असत. सावित्रीबाई यांनी शिक्षिकेचे व्रत अंगीकारून पतीच्या कार्यात पूर्ण सहकार्य दिले. त्यांच्या या योगदानामुळे महिला-शिक्षणाची महाराष्ट्रातील अग्रणी म्हणून सावित्रीबाईंचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हता, कारण त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती. यासाठी सावित्रीबाईंनी खूप संघर्ष केला आणि या रूढीला तोडण्यासाठी पती जोतिबांच्या साहाय्याने 1 जानेवारी 1848 पासून शिक्षणाचे माहेर घर असे ज्याला आज आपण म्हणतो त्या पुण्याच्या भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. पती जोतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक साहाय्य न घेता सुरूवात करून दोघांनी पुढे अनेक शाळा सुरू केल्या. महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरीत सावित्रीबाई सतत या क्षेत्रात काम करीत राहिल्या.
सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे बहुजन समाजाचे हे जोडपे आणि त्यांचे त्याकाळातील कार्य संस्मरणीय आहे. म. फुले यांनी मुलींसाठी काढलेल्या शाळेत लहुजी साळवे यांनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस पाठविले आणि राणबाच्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. पुढे शाळेत मुलींची संख्या वाढत गेली. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती. या दरम्यान त्यांच्या समस्या वाढत गेल्या सावित्रीबाई शिकविण्याकरता ज्यावेळेस घरून निघत असत त्या दरम्यान शाळा ते विद्यालय हे अंतर पार करतांना त्यांना अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागत असे. असे तरी देखील त्या त्यांच्या निश्चयापासून डगमगल्या नाहीत, ध्येयापासून परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि महिला शिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली. अस्पृश्याचे हाल पाहून जोतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. जोतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली.
सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे तर त्या एक उत्तम कवयित्री, अध्यापिका, समाजसेविका देखील आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता खर्ची घातले.
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतीपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. त्यानंतरही सावित्रीबाई फुले यांनी आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले.
शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात… ‘विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन..’सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिकविणे सुरू केले, यात त्यांच्या जोडीने महिला शिक्षणाची ज्योत पुढे नेण्याचे काम केले ते फातिमा शेख यांनी. त्या खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंच्या सहकारी, सखी आणि सहशिक्षिका मानल्या जातात. सावित्रीबाईंच्या अनुपस्थितीत त्यांनी सुरू केलेल्या शाळेची धुरा त्या समर्थपणे सांभाळत. काही ठिकाणी वाचनात येते की, महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. त्यावेळेस उस्मान शेख यांनी त्यांना आपल्याकडे जागा दिली. फातिमा त्या उस्मान शेख यांची बहीण होत्या. १९२४-३० या काळात पुण्यातून मजूर हे मासिक प्रकाशित होत होते, त्या मासिकात सावित्रीबाईंसह फातिमा शेख यांचा फोटो छापला होता असा उल्लेख डॉ.मा.गो.माळी यांनी आपल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केला आहे. असाच फोटो लोखंडे नावाच्या ख्रिस्ती मिशनऱ्याने काढलेल्या पुस्तकातही प्रसिद्ध केला होता, हे दोन्ही फोटो सारखेच असल्याने सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांची ओळख पटते, असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेल्या एका पत्रात, ‘माझी तब्येत ठीक होताच मी परत येईन, फातिमाला सध्या त्रास होईल, पण ती कुरकूर करणार नाही, असा फातिमा शेख यांचा उल्लेख सापडतो. सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्या वंचिताच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढल्या.
एकविसाव्या शतकात स्वतंत्र भारतातील महिला शिक्षण क्रांतीच्या मोठ्या टप्प्यावर उभे आहे. प्रामुख्याने शहरी विभागापुरते मर्यादित असलेले हे शिक्षण आता ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागापर्यंत विस्तारले आहे. एक महिला शिकली की, ती सारे कुटुंब साक्षर करते, संस्कारक्षम करते, या महात्मा फुलेंच्या वचनाला स्मरून महिला-शिक्षणाला भारतवर्षाने प्राधान्यक्रम दिला आहे. महिलेला शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रांत आता समान संधी आहे. ज्या देशात महिलांचे कर्तृत्व जगाला गवसणी घालते, त्या देशात महिलांचा आणि महिला शिक्षणाचाही खऱ्या अर्थाने सन्मान होतो. याची सुरूवात सावित्रीबाईंनी केली, याचे श्रेय निश्चितच त्यांना जाते.
महाराष्ट्र राज्य हे स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रातील प्रागतिक राज्य असून सावित्रीबाई फुले दत्तक योजनेची अभिनव कल्पना महाराष्ट्रात राबविली गेली. बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा पायंडा महाराष्ट्रात प्रथम पाडला गेला. असंख्य अडचणींवर मात करून महिला शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘महिला शिक्षणदिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यांच्या ३ जानेवारी या जन्मदिवसापासून ते शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या १२ जानेवारी या जन्मदिनापर्यंत शाळांमधून ‘जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहेत.
महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, महिला उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या क्रांतिज्योति सावित्रीबाईंना त्यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
- शब्दांकन : ब्रिजकिशोर झंवर